थायरॉईडपासून हार्मोनल असंतुलनापर्यंत वाढू शकतात धोके; तज्ज्ञांनी दिला सावधगिरीचा इशारा
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत परफ्युम वापरणं ही अनेकांची सवय बनली आहे. स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी आणि आकर्षक सुगंधासाठी लोक दररोज परफ्युमचा वापर करतात. मात्र परफ्युम कुठे आणि कशा प्रकारे लावायचं, याकडे दुर्लक्ष केल्यास सौंदर्याऐवजी आरोग्याचं नुकसान होण्याची शक्यता असते. विशेषतः मानेवर किंवा घशाजवळ थेट परफ्युम स्प्रे करणं दीर्घकाळात गंभीर ठरू शकतं.
मानेवरील त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. या भागातून केमिकल घटक शरीरात वेगानं शोषले जातात. त्यामुळे परफ्युममधील रसायनं थेट रक्तप्रवाहात मिसळण्याचा धोका वाढतो. अनेकांना याची कल्पना नसते, पण रोज ही सवय सुरू ठेवल्यास हळूहळू शरीरावर विपरीत परिणाम दिसू शकतात.
मानेखाली असलेली थायरॉईड ग्रंथी शरीरातील हार्मोनल संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. वजन नियंत्रण, ऊर्जा पातळी, हृदयाचे ठोके, मानसिक स्थिती, मासिक पाळी आणि प्रजनन क्षमता या सर्व गोष्टी थायरॉईडशी थेट संबंधित असतात. या भागावर सातत्यानं केमिकलयुक्त परफ्युम वापरल्यास ग्रंथीच्या कार्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते.
काही परफ्युममध्ये ‘एंडोक्राइन डिसरप्टर्स’ नावाची घातक रसायनं असतात. ही द्रव्यं शरीरातील हार्मोनल प्रणालीमध्ये अडथळा आणू शकतात. दररोज वापरामुळे ही रसायनं शरीरात साठत जातात आणि पुढे थायरॉईड समस्या, वजनात अचानक बदल, सतत थकवा जाणवणं, मूड स्विंग्स आणि हार्मोनल असंतुलन यासारखे त्रास उद्भवू शकतात.
याशिवाय काही प्रकरणांमध्ये प्रजननाशी संबंधित अडचणीही निर्माण होऊ शकतात. महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होणं, गर्भधारणेत अडथळे येणं किंवा मानसिक अस्थिरता जाणवणं असे परिणाम दिसू शकतात. त्यामुळे परफ्युम वापरताना केवळ सुगंधावर नाही, तर आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडेही लक्ष देणं आवश्यक आहे.
तज्ज्ञांचा सल्ला:
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, परफ्युम थेट त्वचेवर, विशेषतः मान किंवा घशाच्या भागावर फवारणं टाळावं. शक्य असल्यास कपड्यांवर हलक्या प्रमाणात परफ्युम वापरणं अधिक सुरक्षित ठरतं. तसेच जास्त परफ्युम वापरण्याऐवजी मर्यादित आणि सुज्ञ वापर करणं शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं.




