मोर(peacock )म्हणलं कि आपल्याला पहिले आठवत ते ‘नाच रे मोरा’ हे बालगीत.. पिसारा फुलवून थुईथुई नाचणारा हा मोर शक्यतो कुठेही लवकर दिसून येत नाही. याला पाहण्यासाठी आपल्याला जंगलात रानावनात किंवा अगदीच अभयारण्यात जाण्याचा प्लॅन आखावा लागतो. पण, महाराष्ट्रात असं एक गाव आहे जिथे असंख्य मोरांचे दर्शन घडते. जिथं पाहू तिथे फक्त मोरचं मोर असतात .. तेथील रहिवासीयांच्या अंगणात, गावातील रस्त्यांवर, शेतातील बांधांवर फक्त मोरचं मोर. हे मोर पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येथे येतात.
अष्टविनायका गणपतीच असलेलं रांजणगावापासून साधारण 23 km अंतरावर ‘मोराची चिंचोली’ हे एक गाव आहे . साधारण पुणे नगर रस्त्यावर शिरूर शिकरापूर जवळच हे गाव आहे. अहमदनगर मार्गावरून डाव्या हाताला शिक्रापूर फाट्यावरून आत गेल्यास हे गाव दिसतं. मोराची चिंचोली हे गाव गर्द झाडीने वेढलेले असून भरपूर मोर असलेले हे गाव आहे. या गावाला मोरांमुळेच एक वेगळी ओळख मिळाली आहे.
जून ते डिसेंबर हा काळ मोराचे थवे पाहण्यासाठी योग्य आहे. हिवाळ्यात तर मोराचा फुललेला पिसारा पाहून मन प्रफुल्लीत होते. फोटोशूटवर येथे बंदी नाही. तुम्ही येथे मनसोक्त फोटोशूट सुद्धा करू शकता. येथे नुसतचं मोर नसून किकीर्डे, खंड्या, खार, भारद्वाज, कबुतरं सुद्धा पाहायला मिळतील. येथे अनेक विविध काम देखील केली जातात. त्याबरोबरच शेतीची कामे करणे, रहाटाने पाणी काढणे, हुरडा पार्टी, चुलीवरची भाकरी, पिठलं अशा जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. त्यामुळे सुट्टीच्या दिवसात लहान मुलांसोबत येथे जाण्याचा प्लॅन तुम्ही नक्कीच करू शकता.




