शूटिंगच्या झगमगाटामागचं भयावह वास्तव; पार्वती थिरुवोथूचा धक्कादायक अनुभव उघड
चित्रपटसृष्टी बाहेरून जितकी झगमगती दिसते, तितकीच ती आतून अनेकदा कठोर आणि असंवेदनशील असते. सेटवर काम करताना अभिनेत्रींसमोर काही असे प्रसंग उभे राहतात, जे केवळ त्रासदायकच नव्हे तर धक्कादायकही असतात. पूर्वी हे अनुभव गप्पच राहायचे, मात्र आता अनेक अभिनेत्री निर्भीडपणे इंडस्ट्रीतील कटू सत्य समोर आणत आहेत.
असाच एक हादरवून टाकणारा अनुभव मल्याळम सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पार्वती थिरुवोथू हिने नुकत्याच एका मुलाखतीत शेअर केला आहे. ‘मरियान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला हा प्रकार असल्याचं तिने सांगितलं. या सिनेमात धनुष मुख्य भूमिकेत होता.
पार्वतीच्या म्हणण्यानुसार, शूटिंगच्या पहिल्याच दिवशी तिला पूर्णपणे पाण्यात भिजवण्यात आलं. एका रोमँटिक सीनदरम्यान दिग्दर्शक सतत तिच्यावर पाणी टाकण्यास सांगत होते. त्या वेळी तिच्याकडे अतिरिक्त कपडे नव्हते आणि सेटवर तिची योग्य काळजी घेण्यासाठी कोणीही उपस्थित नव्हतं.
परिस्थिती अधिक गंभीर होत गेल्यावर तिने दिग्दर्शकाला कपडे बदलण्यासाठी हॉटेलला जाण्याची परवानगी मागितली. मात्र, “माझ्याकडे वेळ नाही,” असं सांगत दिग्दर्शकाने तिला स्पष्ट नकार दिला. अखेर, मानसिक आणि शारीरिक त्रासाच्या टोकाला पोहोचल्यावर तिला मोठ्याने सांगावं लागलं की, तिला मासिक पाळी सुरू झाली आहे आणि तिथून जाणं तिच्यासाठी आवश्यक आहे. तेव्हा दिग्दर्शकही पूर्णपणे गोंधळलेला दिसत होता. विशेष म्हणजे, त्या संपूर्ण सेटवर केवळ तीन महिला उपस्थित होत्या, असंही तिने नमूद केलं.
पार्वती थिरुवोथू ही केवळ उत्कृष्ट अभिनेत्रीच नाही, तर सामाजिक विषयांवर परखड मत मांडणारी कलाकार म्हणूनही ओळखली जाते. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या संवेदनशीलतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.




