अगदी शहरांपासून गावातल्या कोपऱ्या कोपऱ्यातील घरापर्यंत पोहोचलेलं पार्लेजी बिस्कीट, पार्ले बिस्कीट (Parle Biscuit) आणि त्यासोबतच्या आठवणीं मनात कायम राहतील पण याच पार्लेजी कंपनीची इमारत आता जमीनदोस्त होणार आहे. पार्लेजीनं लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक आठवणी दिल्या. या आठवणी आता फक्त मनातच उरणार आहेत. मुंबईतल्या विलेपार्ले स्टेशनवर उतरलं की, वाऱ्याच्या लहरीसोबत येणारा तो बिस्किटांचा गोड सुगंध फक्त आठवणींतच राहणार आहे. आता इथे पार्लेजी मिळायचं हे म्हणताही येणार नाही.
गेल्या अनेक दशकांपासून भारताच्या घराघरांत पोहोचलेल्या पार्ले-जी बिस्किटांचा जन्म ज्या विलेपार्ल्यात झाला ती जागा अखेर जमीनदोस्त होणार आहे. ज्या भिंतींनी बिस्किटांचा प्रवास, अनेक आठवणी पाहिल्या आहेत. विलेपार्लेकरांसाठी ही फॅक्टरी केवळ एक इमारत नव्हती, तर त्यांच्या ओळखीचा एक भाग होती. पार्ले बिस्किट फॅक्टरी हे नाव तिथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी एक महत्त्वाचा लॅण्डमार्क होता. मुंबई महानगरपालिकेकडून कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळाल्यामुळे आता लवकरच तिथे पाडकामाला सुरुवात होईल. १.९० लाख चौरस मीटरचे हे भव्य बांधकाम पार्लेचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे.




