लहानपणापासून योग्य सवयी लावल्यास घडतो सुसंस्कृत आणि आत्मविश्वासी व्यक्तिमत्त्व
पालकांना आपल्या मुलांनी सुसंस्कृत, हुशार, प्रामाणिक आणि आयुष्यात यशस्वी व्हावे, अशी मनापासून इच्छा असते. मात्र ही घडण एका दिवसात होत नाही, तर ती लहानपणापासूनच योग्य सवयींमधून घडते. विशेषतः मुले ५ वर्षांची झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. या वयात मुलांची समज, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि आठवणशक्ती झपाट्याने विकसित होत असते. त्यामुळे याच काळात त्यांना चांगल्या सवयींचे संस्कार देणे अत्यंत गरजेचे ठरते.
तज्ञांच्या मते, मुलांना लहानपणापासून सत्य बोलण्याची सवय लावणे फार महत्त्वाचे आहे. चूक झाली तरी ती लपवण्याऐवजी सत्य स्वीकारायला शिकवल्यास मुलांमध्ये प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास वाढतो.
त्याचप्रमाणे, मोठ्यांचा आदर करण्याची शिकवण मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात मोलाची भूमिका बजावते. आदर आणि प्रेमातून मुलांमध्ये सहानुभूती, चांगले वर्तन आणि प्रभावी संवाद कौशल्ये विकसित होतात. अशा वातावरणात वाढलेली मुले स्वतःला सुरक्षित समजतात आणि जबाबदार नागरिक बनतात.
वेळेचे महत्त्व लहान वयातच समजावून सांगणेही आवश्यक आहे. प्रत्येक कामासाठी ठराविक वेळ ठेवण्याची सवय लावल्यास मुलांच्या दिनचर्येत शिस्त निर्माण होते आणि त्यांना वेळेची किंमत उमगते.
सामाजिक कौशल्यांचाही मुलांच्या आयुष्यात मोठा वाटा असतो. ‘प्लीज’, ‘थँक यू’ आणि ‘सॉरी’ असे साधे शब्द वापरण्याची सवय, तसेच आपल्या गोष्टी इतरांबरोबर वाटून घेणे, यामुळे मुलांमध्ये परोपकाराची भावना आणि माणुसकी टिकून राहते.
आजच्या डिजिटल युगात मोबाईलचा वाढता वापर मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत आहे. त्यामुळे लहान वयापासूनच मुलांना मैदानी खेळांकडे वळवणे गरजेचे आहे. मैदानी खेळांमुळे मुलांचे शारीरिक आरोग्य तर सुधारतेच, शिवाय मानसिक तणावही कमी होतो. खेळून झाल्यावर खेळणी आणि वाचून झाल्यावर पुस्तके जागेवर ठेवण्याची सवय लावल्यास मुलांमध्ये जबाबदारीची जाणीवही निर्माण होते.
एकूणच, योग्य वयात योग्य सवयींचे संस्कार केल्यास मुलांचे व्यक्तिमत्त्व सशक्त, शिस्तबद्ध आणि यशस्वी घडण्यास नक्कीच मदत होते.




