स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांच्या लग्नाला मोडून आता दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असला, तरी त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, याबाबतच्या चर्चा अजूनही थांबलेल्या नाहीत. या प्रकरणात आता एक नवा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. स्मृती मंधानाचा जुना मित्र आणि पलाश मुच्छलचा माजी बिझनेस पार्टनर असलेल्या विद्यान माने यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. अभिनेता व निर्माते विद्यान माने यांनी दावा केला आहे की, पलाश मुच्छल जेव्हा एका दुसऱ्या महिलेसोबत बिछान्यावर रंगेहात पकडला गेला, तेव्हा ते स्वतः तिथे उपस्थित होते. ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत 34 वर्षीय माने यांनी सांगितले की, 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या लग्न समारंभादरम्यान मी तिथेच होतो. पलाश दुसऱ्या महिलेसोबत बिछान्यावर रंगेहात सापडला. तो क्षण अत्यंत भयानक होता. भारतीय महिला क्रिकेटपटूंनी त्याला चांगलीच मारहाण केली. संपूर्ण कुटुंबच चोर आहे. मला वाटलं होतं की तो लग्न करून सांगलीत स्थायिक होईल, पण हे सगळं माझ्यासाठी पूर्णपणे उलट ठरलं.
विद्यान माने यांनी पलाश मुच्छलवर आर्थिक फसवणुकीचेही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की ते स्मृती मंधानाचे बालपणीचे मित्र आहेत आणि पलाशची ओळख त्यांना मंधाना कुटुंबाच्या माध्यमातून झाली होती. माने यांच्या म्हणण्यानुसार, पलाश मुच्छलने एका अद्याप प्रदर्शित न झालेल्या चित्रपटात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली त्यांची 40 लाख रुपयांहून अधिक रक्कम फसवणूक करून घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी महाराष्ट्रातील सांगली येथे पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली आहे.




