स्मृतीच्या वडिलांची तब्येत आणि पलाशचे कथित फ्लर्टी मेसेज दोन्ही कारणांमुळे गोंधळ; पलक मुच्छलचे दोन्ही कुटुंबांना सकारात्मकतेचा संदेश
टीम इंडियाची स्टार बॅटर स्मृती मानधना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांचं येऊ घातलेलं लग्न अचानक पुढे ढकलण्यात आलं आणि क्रिकेट व म्युझिक इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली. सुरुवातीला यामागचं कारण स्मृतीच्या वडिलांची प्रकृती असल्याचं समोर आलं. मात्र त्याच वेळी सोशल मीडियावर पलाशचे कथित फ्लर्टी चॅट्स व्हायरल होताच परिस्थिती पूर्ण बदलली. नेटकऱ्यांनी पलाशवर फसवणुकीचे आरोप करत चर्चांना अधिक हवा दिली.
या संपूर्ण प्रकरणावर दोन्ही कुटुंबीयांनी काहीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर पलाशची बहीण आणि प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलनं मौन सोडलं. ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “दोन्ही कुटुंबे कठीण काळातून जात आहेत. अशा वेळी शक्य तितकी पॉझिटीव्हीटी पसरवणं आणि मजबूत राहणं महत्त्वाचं आहे.”
याआधीही पलकने इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत लग्न पुढे ढकलल्याचं कारण स्पष्ट केलं होतं. तिने लिहिलं होतं “स्मृतीच्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्याने दोघांचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. या काळात दोन्ही कुटुंबांच्या प्रायव्हसीचा आदर करा.” पण पलाश मुच्छलच्या व्हायरल चॅट्समुळे परिस्थिती अधिकच बिघडली. सोशल मीडियावर त्याच्या पूर्वीच्या डेटिंग अफवा, त्याचे अनेक मुलींशी असलेले कथित संबंध, तसेच त्याने अनेकांना एकाच प्रकारे प्रपोज केल्याच्या गप्पाही चर्चेत आहेत. नेटकऱ्यांनी तर त्याच्या भूतकाळाचा कच्चाचिठ्ठा काढल्याचं दिसत आहे.
या सर्व घडामोडींमुळे इंटरनेटवर दोन वेगवेगळे गट तयार झाले एक गट पलाशची बाजू घेतोय, तर दुसरा स्मृती मानधनाला सहानुभूती देत तिने सावध राहण्याचा सल्ला देतोय. लग्न पुढे ढकलल्याने निर्माण झालेली उत्सुकता आणि व्हायरल चॅट्समुळे निर्माण झालेली नवी वादळं यावर सध्या सोशल मीडियावरच सर्वात मोठी चर्चा रंगली आहे.




