पहिल्या नजरेतच गोंधळ उडवणारा चेहरा; चाहते म्हणतात – “ही खरी अनुष्का तर नाही ना?”
बॉलिवूडपासून थोडी दूर असली तरी अनुष्का शर्माची लोकप्रियता आजही तितकीच कायम आहे. चित्रपटांमध्ये सध्या सक्रिय नसली, तरी पती विराट कोहलीसोबत स्टेडियममध्ये दिसणं असो किंवा अध्यात्मिक कार्यक्रमांना हजेरी लावणं—अनुष्का नेहमीच चर्चेत असते. तिच्या कमबॅकची चाहत्यांना अजूनही उत्सुकता आहे. अशातच आता सोशल मीडियावर एक अशी तरुणी व्हायरल होत आहे, जिला पाहून क्षणभर कुणालाही वाटेल—ही अनुष्का शर्मा तर नाही?
ही तरुणी भारतातली नसून पाकिस्तानमधील असल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे ‘लूक-अलाइक’ आधीच चर्चेत आले आहेत आणि आता या यादीत अनुष्का शर्माचंही नाव जोडलं गेलं आहे. अनुष्कासारखे हावभाव, स्माईल आणि चेहऱ्याची ठेवण पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
या अनुष्कासारख्या दिसणाऱ्या पाकिस्तानी तरुणीचं नाव अनिशा तसनीम आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती मित्रमैत्रिणींमध्ये हसत-खेळत दिसते आणि तिचं ते निरागस हास्य अक्षरशः अनुष्काची आठवण करून देतं. काही क्षणांसाठी तरी प्रेक्षकांचा गोंधळ उडतो आणि “ही खरंच अनुष्का आहे का?” असा प्रश्न मनात येतो.
हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर युजर्सच्या प्रतिक्रिया अक्षरशः उसळल्या आहेत. काहींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे, तर काहींनी मजेशीर आणि कौतुकास्पद कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी अनिशाला “क्युट अनुष्का शर्मा” असं संबोधलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून ४ लाखांपेक्षा जास्त वेळा तो पाहिला गेला आहे.
एका युजरनं लिहिलं, “मी आयुष्यात इतकी क्युट मुलगी कधी पाहिली नाही.” तर दुसऱ्यानं कमेंट केली, “अनुष्का शर्मा, रियल आयडीवरून या!” काहींनी तर थेट अनुष्काच्या नावासोबत लाल हृदयाचा इमोजी शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, अनुष्का शर्मा शेवटची 2018 मधील ‘झिरो’ या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर ती अभिनयापासून दूर असली, तरी तिनं स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत काही प्रोजेक्ट्सची निर्मिती केली आहे. आता चाहत्यांच्या नजरा तिच्या कमबॅककडे लागल्या असतानाच, तिच्यासारखी दिसणारी ही पाकिस्तानी तरुणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.




