ओतूर,प्रतिनिधी: दि.२४ नोव्हेंबर ( रमेश तांबे )
ओतूर जवळील डोमेवाडी ( ता. जुन्नर ) येथे शेतमजुरावर हल्ला करणाऱ्या बिबट्याची मादी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
गोरख पुनाजी शेळकंदे वय २९, रा.वालहिवरे, ता.मुरबाड (Murbad),जि. ठाणे (Thane) हा शेतमजुर डोमेवाडी येथील तुकाराम सजन ढोमसे यांच्या शेतात काम करत असताना,दि.१७ रोजी दुपारी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. दरम्यान हल्ला झालेल्या ठिकाणी वनविभागाने पिंजरा लावावा,अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली होती.
ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी वन कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन, या ठिकाणी पिंजरा लावला होता. शनिवारी दि.२२ रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याची मादी जेरबंद झाली. बिबट्याची मादी पिंजऱ्यात अडकल्याचे समजताच,ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनात वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, किसन खरोडे, किसन केदार, गणपत केदार, गंगाराम जाधव, रोहित लांडे, सचिन गुळवे, संजय भालेकर हे घटनास्थळी पोहचले.हा बिबट हा मादी जातीचा असून,तिचे वय अंदाजे साडेतीन ते चार वर्षे असावे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बिबट्याच्या मादीला ताब्यात घेऊन, माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात दाखल केले असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.




