जनावरांसह सहा लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
ओतूर,प्रतिनिधी:दि.२९ डिसेंबर ( रमेश तांबे )
जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची दुभती जनावरे चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना,पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली असून,आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत तसेच पाच जनावरे व गुन्ह्यात वापरलेली पिकअप वाहन असा एकूण ६ लाख १० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली असून पोलीसांनी नरेश भाऊ मोरे वय ३९ वर्षे, सुरज अशोक पारधी वय १९ वर्षे दोघेही राहणार कळंबड, ता. मुरबाड, जि.ठाणे अशी आरोपींची नावे आहेत.
मधुकर रामजी गायकर वय ६५ वर्षे व्यवसाय शेती रा.आंबेगव्हाण ता. जुन्नर जि.पुणे यांच्या गोठ्यातील दोन म्हशी पैकी एक म्हैस दि.१२ डिसेंबर २०२५ रोजी पहाटेच्या वेळी चोरी गेली होती. त्या अनुषंगाने गायकर यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे.
जुन्नर तालुक्यात मागील काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांची जनावरे चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने ओतूर,जुन्नर,आळेफाटा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असून,
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी गुन्ह्याची शृंखला व गंभीरता लक्षात घेवून गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता एक विशेष तपास पथक स्थापन केले. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वरील गुन्ह्याचा
तपास समांतर रित्या सुरू केला. सर्व घटनास्थळाची पाहणी करून फिर्यादी व साक्षीदार यांचेकडे चौकशी केली.सर्व गुन्ह्यांमध्ये दुभती जनावरे ही रात्रीचे वेळी चोरी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे चारचाकी पिकअप वाहनाचा वापर करणेत आल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुमारे १२० किमी पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासणेत आले. प्रत्येक गुन्ह्यातील चोरी करणारे वाहन हे माळशेज घाटाकडे जात असल्याचे तपासा दरम्यान समोर आले.
तपास पथकाकडून गुन्ह्याचा तपास सुरू असताना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार नरेशी भाऊ मोरे रा. कळबड ता. मुरबाड जि ठाणे याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने वरील गुन्हे केले असून,त्याच्या जवळ पिकअप हे वाहन आहे. त्या बातमीचे आधारे संशयित आरोपीचाबत माहिती काढून खात्री करत असताना, दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी तपास पथक हे ओतूर परिसरात गुन्हे तपास करत असताना,आरोपी नरेश भाऊ मोरे व त्याचा साथीदार असे पिकअप वाहनात म्हैस घेवून विक्री साठी जात असून ते सध्या खुबी गावचे जंगलाजवळ आहेत, अशी बातमी मिळाल्याने तपास पथकाने आरोपी नरेश मोरे व सुरज पारधी यांना त्यांचे ताब्यातील पिकअप चारचाकी वाहन नं.एम.एच. ०५ डी. के.२७६१ सह ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता व,त्यांचेकडील चौकशीत एकूण ५ म्हशी हस्तगत करण्यात आल्या असून, गुन्ह्यात वापरलेल्या वाहन हस्तगत करण्यात आले आहे. आरोपींकडून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदर गुन्ह्यातील आरोपी नरेश भाऊ मोरे याच्यावर जनावरे चोरीचे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपीना मा. न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी रिमांड मंजूर करणेत आली आहे.
दुभती जनावरे शेतकऱ्यांना पुन्हा ताब्यात मिळाल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी समाधान व्यक्त करून, पोलीसांचे आभार मानले आहेत. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स.पो.नि. महादेव शेलार,ओतूर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.लहू थाटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदीप वारे, राजु मोमीण,अक्षय नवले तसेच ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नदीम तडवी,दिनेश साबळे,रोहित बोंबले यांनी केली आहे.




