मोदी सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव बदलणार आहे.
मोदी सरकारने गेल्या दोन दशकांपासून चालू असलेल्या महात्मा गांधी (Mahatma Gandhi) ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सध्या चालू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नवे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकाच्या माध्यमातून मनरेगा योजनेचे स्वरुपही बदलण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेतील महात्मा गांधी यांचे नाव बदलून या योजनेचे नाव आता ‘विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड अजीविका मिशन’ म्हणजेच व्हीबी-जी-राम-जी असे करण्यात येणार आहे. सरकारच्या याच निर्णयामुळे विरोधक चांगलेच संतापले आहेत. विरोधकांच्या संतापाची प्रचिती आज (16 डिसेंबर) संसदेत पाहायला मिळाली. विरोधकांनी ससंदेतच जोरदार आंदोलन केले.
विरोधकांनी मोदी सरकारच्या या विधेयकाचा विरोध केला. मोदी सरकार महात्मा गांधी हे नाव मिटवून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. सरकारच्या या विधेयकला विरोध दर्शवण्यासाठी आज काँग्रेस (Congress) तसेच विरोधी पक्षातील इतर खासदारांनी एकत्र येत आंदोलन केले. या आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे यादेखील सहभागी होत्या. आंदोलनावेळी खासदारांच्या हातात महात्मा गांधी यांचा फोटो होता. तसेच आंदोलक खासदार महात्मा गांधी यांच्या नावाचा जयघोष करत सरकारच्या विधेयकाचा विरोध करताना पाहायला मिळाले.




