सहकाऱ्यांशी नातं मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या
ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वभावाच्या आणि काम करण्याच्या पद्धतींच्या लोकांसोबत काम करताना मतभेद होणं साहजिक आहे. मात्र हे छोटे वाद वेळेत मिटवले नाहीत, तर त्याचं रूपांतर मनभेदात होतं. याचा थेट परिणाम कामाच्या वातावरणावर आणि वैयक्तिक आयुष्यावरही होऊ शकतो. त्यामुळे सहकाऱ्यांशी चांगले संबंध टिकवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
कमीत कमी बोलणं ठेवा
ऑफिस हे कामासाठी असतं, गप्पांसाठी नाही. सतत इतरांबद्दल चर्चा करणं किंवा कुणाची वैयक्तिक माहिती पसरवणं वादाचं कारण ठरू शकतं. त्यामुळे अशा गोष्टी टाळून कामावर लक्ष केंद्रित करणं फायद्याचं ठरतं.
सगळ्यांशी सन्मानाने वागा
ऑफिसमध्ये पद किंवा कामाचं स्वरूप वेगळं असलं तरी प्रत्येक व्यक्तीला आदर देणं महत्त्वाचं आहे. कुणालाही कमी लेखणं किंवा अपमानास्पद बोलणं नात्यांमध्ये कटुता निर्माण करू शकतं. सन्मानाची वागणूकच तुमची सकारात्मक ओळख बनवते.
मदतीचा हात पुढे करा
एखाद्या सहकाऱ्याला अडचण आली असेल तर शक्य तेवढी मदत करावी. कायम ‘मी बिझी आहे’ असं सांगणं तुमची नकारात्मक प्रतिमा तयार करू शकतं. एकमेकांना सहकार्य केल्यास टीमवर्क मजबूत होतं.
अहंकार टाळा
कंपनीत किती वर्षांचा अनुभव आहे, याचा गर्व न करता नम्रतेने वागणं आवश्यक आहे. ‘मला सगळं माहिती आहे’ अशी भूमिका घेतल्यास इतरांमध्ये नाराजी वाढते आणि मतभेद निर्माण होतात. थोडी समजूतदारपणा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर ऑफिसमधील वातावरण अधिक आनंदी आणि शांत राहू शकतं.




