राजकीय पक्ष व उमेदवारांनी जाहिरात प्रसारणापूर्वी माध्यम प्रमाणन समितीची मंजुरी घेणे आवश्यक
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर प्रचार आणि प्रसिद्धी करताना इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करणाऱ्या राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आदर्श आचारसंहिता व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक जाहिरातींसाठी पूर्वप्रमाणन (Pre-Certification) घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे कार्यरत असून, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा) रश्मी नांदेडकर आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे हे सदस्य आहेत.
निवडणूक काळात दूरदर्शन, केबल व उपग्रह वाहिन्या, यूट्यूब, एफएम रेडिओ, समाजमाध्यमे, संकेतस्थळे, ई-वृत्तपत्रे, बल्क व व्हॉईस एसएमएस, सार्वजनिक ठिकाणचे ऑडिओ–व्हिज्युअल डिस्प्ले अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जाहिरात प्रसारित करायची असल्यास ती आधी समितीकडून मंजूर करून घेणे बंधनकारक आहे. पूर्वप्रमाणन न घेतलेल्या जाहिराती प्रसारित किंवा प्रसिद्ध करता येणार नाहीत.
जाहिरात प्रसारणाच्या प्रस्तावित तारखेपूर्वी किमान पाच कार्यालयीन दिवस आधी ‘परिशिष्ट–4’ नुसार अर्ज सादर करावा लागणार आहे. हा अर्ज नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या माध्यम निरीक्षण कक्षात उपलब्ध असून, आवश्यक कागदपत्रांसह त्याच ठिकाणी सादर करावा लागेल. अर्जासोबत जाहिरातीच्या इलेक्ट्रॉनिक प्रती दोन पेनड्राईव्हमध्ये तसेच साक्षांकित दोन मुद्रित प्रती जोडणे आवश्यक आहे.
धर्म, जात, भाषा, लिंग यांच्या आधारे तेढ निर्माण करणारा, हिंसा भडकावणारा, संविधान व कायद्याचे उल्लंघन करणारा, बदनामीकारक, अश्लील किंवा राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहोचवणारा आशय असलेल्या जाहिरातींना मंजुरी दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जाहिरातीवरील खर्च राजकीय पक्षाने केल्यास तो पक्षाच्या खर्चात, तर उमेदवाराने केल्यास उमेदवाराच्या निवडणूक खर्चात दाखवणे बंधनकारक आहे. सर्व देयके धनादेश, ऑनलाइन किंवा बँकिंग माध्यमातूनच स्वीकारली जातील; रोख व्यवहारास पूर्णतः मनाई आहे.
मराठी, हिंदी व इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांतील जाहिरातींसाठी अनुवादित प्रती व नोटराइज्ड प्रतिज्ञापत्र सादर करणेही आवश्यक राहील. अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीन कार्यालयीन दिवसांत समिती निर्णय देणार असून, सूचवलेल्या बदलांचे पालन करणे अर्जदारावर बंधनकारक असेल.
15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुका मुक्त, निर्भय, पारदर्शक व निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात, यासाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि प्रसारमाध्यमांनी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.




