spot_img

New Year 2026 Resolution For Parents : नवीन वर्षात पालक–मुलांचं नातं भक्कम करा हे ५ पालकत्व संकल्प बदलतील सगळं चित्र

spot_img

परिपूर्णतेपेक्षा उपस्थिती, तुलना नव्हे तर समज—मुलांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी नवे वर्ष ठरवा खास

नवीन वर्षाची सुरुवात झाली की प्रत्येकजण काही ना काही संकल्प करतो. वाईट सवयी सोडायच्या, चांगल्या सवयी अंगीकारायच्या… पण जर तुम्ही पालक असाल, तर या वर्षी स्वतःसाठी नव्हे तर तुमच्या मुलांसाठी काही खास संकल्प करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण पालक–मुलांचं नातं मजबूत असेल, तर आयुष्यातली कुठलीही अडचण सहज पार करता येते. चला जाणून घेऊया असे पाच पालकत्व संकल्प, जे तुमचं नातं अधिक घट्ट करतील.

१) परिपूर्णतेपेक्षा उपस्थितीला प्राधान्य द्या

अनेक पालक ‘परफेक्ट’ होण्याच्या नादात मुलांसोबतचा खरा वेळ गमावतात. प्रत्यक्षात मुलांना परिपूर्ण पालक नको असतात, तर त्यांच्यासाठी वेळ काढणारे, मनापासून ऐकणारे पालक हवेत. त्यांच्या भावना समजून घ्या, त्यांच्या गोष्टी शांतपणे ऐका—हेच नात्याचं खरं बळ आहे.

२) आधी स्वतः आदर्श बना

मुलांचा स्क्रीन टाइम वाढल्याची तक्रार करणारे पालक अनेकदा स्वतःच फोनमध्ये गुंग असतात. मुलं उपदेश ऐकत नाहीत, ती पालकांचं वागणं पाहून शिकतात. त्यामुळे या नवीन वर्षात स्वतःचा स्क्रीन टाइम कमी करण्याचा संकल्प करा. तुमचं वागणंच मुलांसाठी शिकवण ठरेल.

३) मुलांच्या भावना हलक्यात घेऊ नका

“ही तर छोटीशी गोष्ट आहे” असं म्हणून मुलांच्या भावना दुर्लक्षित केल्या जातात. पण त्यांच्या दृष्टीने ती समस्या मोठी असू शकते. भावना नाकारल्या गेल्या तर मूल हळूहळू मन बंद करतं. त्यामुळे त्यांच्या भावना मान्य करा, समजून घ्या आणि त्यांना सुरक्षित वाटू द्या.

४) संवाद तोडू नका, संयम ठेवा

मुलं ऐकत नाहीत म्हणून बोलणं थांबवणं हा उपाय नाही. संवाद तुटला, तर नातंही कमकुवत होतं. प्रेम, संयम आणि सातत्याने मार्गदर्शन केलं, तर मूल हळूहळू योग्य-अयोग्य समजू लागतं. नवीन वर्षात संवाद कायम ठेवण्याचा संकल्प करा.

५) तुलना थांबवा, प्रयत्नांची दखल घ्या

इतर मुलांशी केलेली तुलना मुलांच्या मनावर खोल जखम करते. प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याची गतीही वेगळी असते. तुलना करण्याऐवजी त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करा आणि त्यांना स्वतःच्या मार्गाने पुढे जाऊ द्या.

या नवीन वर्षात हे पाच संकल्प अंगीकारले, तर पालक–मुलांचं नातं केवळ मजबूतच नाही, तर अतूट होईल. कारण समज, संवाद आणि प्रेम यावर उभं असलेलं नातं कोणतीही वादळं सहज पेलू शकतं.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ