चिन्मय मांडलेकरनंतर पहिल्यांदाच शिवरायांच्या भूमिकेत बदल; दिग्पाल लांजेकरांच्या बहुचर्चित चित्रपटातील सस्पेन्स अखेर संपला
मराठी मनोरंजनविश्वात सध्या एक मोठी आणि चर्चेची बातमी समोर आली आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘श्री शिवराज अष्टक’ मालिकेतील आगामी चित्रपट ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार, याबाबत गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं असून, अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र शिवरायांच्या भूमिकेत झळकणार आहे.
या चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला टीझर प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला होता. मुघल सत्तेच्या कडेकोट बंदोबस्तात महाराजांनी घेतलेला धाडसी निर्णय, औरंगजेबाच्या दरबारातील तणाव आणि आग्रा स्वारीचा थरार या सगळ्यांची झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली. मात्र टीझरमध्ये महाराजांचा चेहरा स्पष्ट न दाखवल्याने भूमिका साकारणारा अभिनेता कोण, याबाबत सस्पेन्स कायम होता.
हा सस्पेन्स स्वतः अभिजीत श्वेतचंद्रने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टरमधून दूर केला. महाराजांच्या वेशातील त्याचं पोस्टर समोर येताच चाहत्यांकडून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी अभिजीतवर विश्वास व्यक्त करत, तो शिवरायांची भूमिका ताकदीने साकारेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
यापूर्वी दिग्पाल लांजेकर यांच्या चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर साकारत होता. मात्र वैयक्तिक कारणे आणि सततच्या ट्रोलिंगमुळे त्याने पुढे ही भूमिका न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नव्या चित्रपटासाठी नव्या अभिनेत्याची निवड करण्यात आली.
अभिजीत श्वेतचंद्र हा मराठी प्रेक्षकांसाठी नवीन चेहरा नाही. ‘नवे लक्ष्य’, ‘शुभविवाह’, ‘आई तुळजाभवानी’ यांसारख्या मालिकांमधून त्याने छोट्या पडद्यावर आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच ‘सुभेदार’ आणि ‘शिवरायांचा छावा’ यांसारख्या चित्रपटांमधून ऐतिहासिक भूमिकांचा अनुभवही त्याच्याकडे आहे.
आता थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणारा अभिजीत प्रेक्षकांच्या अपेक्षांवर कितपत खरा उतरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट शिवजयंतीच्या मुहूर्तावर, 19 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, शिवचरित्रातील हा शौर्यपूर्ण अध्याय मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.




