संसदेत आवाज उठवणे ‘ड्रामा’ नसल्याची प्रियंका गांधींची टीका
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आणि त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडत “संसद गोंधळ किंवा ड्रामा करण्यासाठी नाही” असे वक्तव्य केले. त्यांच्या या टिप्पणीने राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी थेट पलटवार केला आहे.
पंतप्रधान म्हणाले होते की, ड्रामा करायचा असेल तर त्यासाठी इतर अनेक मंच आहेत परंतु संसद ही लोकांच्या कामासाठीची जागा आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रियंका गांधी म्हणाल्या की संसदेत जनतेचे प्रश्न मांडणे हा ड्रामा नसून लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, महागाई, प्रदूषण, बेरोजगारी यांसारख्या लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेल्या मुद्द्यांवर चर्चा टाळणे हीच खरी नाट्यमयता आहे. “सत्ताधारीच गंभीर विषयांपासून दूर पळतायत. चर्चा न देणे, मुद्दे दाबून टाकणे ही खऱ्या अर्थाने ड्रामेबाजी आहे,” असा त्यांचा आरोप.
प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केलं की संसद म्हणजे संवाद, प्रश्नोत्तरं आणि जनतेच्या समस्यांवर उपाय शोधण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे निवडणूक काळात संवेदनशील विषयांवर बोलणे चुकीचे असल्याचे भासवणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या.




