आता फोटो आणि QR कोडसह Aadhaar Card, जुन्या कार्डपासून किती वेगळं?
आधार कार्डचा दुरुपयोग थांबवण्यासाठी मोठा बदल करण्यात येत आहे. UIDAI चे प्रमुख भुवनेश कुमार यांनी एका ऑनलाईन परिषदेत याविषयी भाष्य केले आहे. आता फोटो आणि QR कोडसह Aadhaar Card येणार आहे. येत्या डिसेंबरपासून हे नियम लागू होतील. आधार कार्डमधील सध्याचे 12 अंक आपली माहिती देतात. जर एखाद्याने तुमच्या कार्डचा फोटो घेतला आणि या अंकांचा दुरुपयोग केला तर धोका उद्भवतो. तुमची वैयक्तिक माहिती चोरल्या जाऊ शकते. नागरिकांची माहिती सुरक्षित राहावी यासाठी नवीन नियम लागू होणार आहे. या नवीन नियमानुसार आता आधार कार्डमध्ये केवळ एक फोटो आणि क्यूआर कोड देण्यात येणार आहे. नवीन आधार नियमानुसार, ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी आधार संख्या आणि बायोमॅट्रिकची माहिती जतन करण्याची कुणालाही परवानगी नसेल. हा नागरिकांच्या माहितीच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा निर्णय आहे.
युआयडीएआय नवीन ॲप सुद्धा लाँच करण्याच्या तयारीत आहे. या मोबाईलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्यात येईल. या ॲपमध्ये QR कोड स्कॅनिंक आणि फेसियल रिकॉग्निशन सारख्या आधुनिक सोयी-सुविधा असतील. डिसेंबर महिन्यात लागू होणाऱ्या नवीन नियमानुसार, आधार कार्डच्या ऑफलाईन व्हेरिफिकेशन कमी करण्याची तयारी करण्यात येत आहे. खासकरून हॉटेल आणि एखाद्या कार्यक्रमात आधार कार्ड मागितले जाते. अशावेळी डेटा लिक होण्याची भीती कायम असते. आधार कार्डचे ऑनलाईन व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व्यक्तीची माहिती गोपनीय असेल.




