spot_img

Nepotism in Maharashtra Politics : स्थानिकची सत्ता राहणार नेत्यांच्याच घरात; कार्यकर्ते उचलणार दरी!

spot_img

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणूका म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रात कुठे 3-4 वर्षानंतर तर कुठे 8-9 वर्षांनी या निवडणुका होत आहेत. अशातच ग्रासरूटचे कार्यकर्ते मोठ्या अपेक्षेने पक्ष नेतृत्वाकडे पाहत होते की त्यांना त्यांच्या ईमानदारीचे, मेहनीतीचे फळ निक्कीच मिळेल, त्यांना पक्षाचा उमेदवार म्हणून घोषित केल जाईल. मात्र पक्षातचे नेतृत्व करणाऱ्यांनी तसे काही केले नाही आणि कार्यकर्त्यांच्या हाती पडली ती निराशाच. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेत्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून आले आहे. यात आमदार, मंत्री, माजी मंत्री, खासदार यांच्या पत्नी, मुले, भावंडे, सुनबाई, आई इत्यादींना तिकिटे मिळाली आहेत. हे सर्व पक्षांमध्ये दिसते, पण कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करून नेत्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य देण्याच्या कारभारावर टीका होत आहे. कार्यकर्ते पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करतात, पण त्यांना संधी मिळत नाही, तर नेत्यांच्या कुटुंबीयांना थेट उमेदवारी मिळते. ह्यालाच राजकारणातला ‘परिवारवाद’ (nepotism) म्हणून ओळखले जाते आणि यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होतो. तसाच असंतोष सध्या सुरू असलेल्या स्थानिकच्या निवडणुकातही दिसून आला, त्यामुळे बंडखोरांची संख्यादेखील वाढली. आज आपण कोणत्या जिल्ह्यात कोणत्या नेत्याच्या नातेवाईकांना निवडणुकीचं तिकीट मिळालय ते पाहणार आहोत आणि अस करण्यात कोणत्या पक्षाने कार्यकर्त्यांना डावलल हे देखील पाहणार आहोत.

यात सगळ्यात आधी येतो तो म्हणजे जळगाव जिल्हा. जळगावात राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या पत्नी साधना महाजन यांना जामनेर नगरपरिषद, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यानंतर मंत्री संजय सावकारे (Sanjay Savkare) यांच्या पत्नी रजनी सावकारे यांना भुसावळ नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी तिकीट दिले गेले आहे. जळगावनंतर धुळे जिल्हा. यात भाजप आमदार अमरिश पटेल यांचा नातू चिंतन पटेलला शिरपूर नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. भाजपचे मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुव्वर रावल यांना डोंडाईचा नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यानंतर आणखीन एक भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण (Pratibha Chavan) यांना चाळीसगाव नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी तिकीट देण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे. इथे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी यांना नंदुरबार नगरपरिषदेसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे आमदार मंत्री अशोक उईके यांची मुलीने यवतमाळ नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पुढे काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका मोघे यांनी देखील यवतमाळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना पुसद नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळाली आहे.

भंडारा जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर यांना भंडारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी पक्षाने तिकीट दिले आहे. अमरावती जिल्ह्यातील भाजपचे आमदार प्रताप अडसाड यांची बहीण अर्चना रोठे यांना धामणगाव रेल्वे नगरपरिषदेत पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिली आहे. त्यानंतर भाजप आमदार प्रकाश भारसकडे यांच्या पत्नी नलिनी भारसकडे यांना दर्यापूर नगरपरिषद, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरवले आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांनी आपल्या मुलाला अर्थात यश लवटेला अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केले आहे. भाजप नेते व मंत्री आकाश फुंडकर यांची बहीण अपर्णा फुंडकर यांना खामगाव नगरपरिषद, नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. शिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चुलत मामेभावाला आल्हाद कलोतीला भाजपने चिखलदरा नगरपरिषद, नगरसेवक पदासाठी उमेदवार बनवले आहे.

छ.संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार मुलगा समीर सत्तारला सिल्लोड नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात भाजप आमदार सचिन कायलन शेट्टी यांचा भाऊ मिलिंद कायलन शेट्टीला भाजपकडून अक्कलकोट नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बनवण्यात आले आहे. शिवसेनेचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा नातू प्रथमेश म्हेत्रेला पक्षाकडून दुधनी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बनवले आहे. त्यानंतर भाजपचे नेते व माजी मंत्री राजन पाटील यांची धाकटी सून प्राजक्ता पाटील यांची अनगर नगरपंचायतीत नगराध्यक्षा म्हणून बिनविरोध निवडही झाली आहे. त्यांच्या विरोधात असलेल्या उज्ज्वला थिटे यांनी पत्रकार परिषद घेऊन राजन पाटील व त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांवर गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार राजन पाटील यांनी सत्तेचा गैरवापर करत थिटेंचा अर्ज अवैद्य ठरवला. दुसरीकडे महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांनाच थेट आव्हान दिले. त्यामुळे अनगरमधील राजकीय वातावरण चांगलच तापलेल पाहायला मिळाल.

अकोला जिल्ह्यातील भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांच्या मोठ्या भावाला भूपेंद्र पिंपळे यांना बाळापूर नगरपरिषद, नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मुलाला अर्थात अनिकेत नाईक निंबाळकर यांना फलटण नगरपरिषद, नगराध्यक्ष पदासाठी पक्षाने तिकीट दिले आहे. तर याच फलटणमध्ये भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा भाऊ समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना देखील नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीत उतरवले आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्येच ही लढत असल्याने याकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे.

याशिवाय शिवसेना शिंदे गटाच्या आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या पत्नी सुनीता पाटील यांना पाचोरा नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केले आहे. शिवसेना शिंदे गटाचेच आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड यांना बुलढाणा नगरपरिषदेत, आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांना संगमनेर नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी, शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ यांना संगमनेर नगरपरिषदेत, शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी संजना चंद्रकांत पाटील यांना मुक्ताईनगर नगरपरिषदेत उमेदवारी मिळाली आहे.

या उपलब्ध माहितीनुसार, भाजपने सर्वाधिक उमेदवारी 15 ठिकाणी नेत्यांच्या कुटुंबीयांनाच उमेदवारी दिली आहे. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) 8 ठिकाणी, राष्ट्रवादी अजित पवार गटाने 7 ठिकाणी, काँग्रेस आणि अपक्ष यांनी प्रत्येकी एक ठिकाणी आपापल्या नेत्याच्या नातेवाईकांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे परिवारवाद हा जवळपास सर्वच पक्षांमध्ये दिसतो, मात्र भाजप आणि महायुतीच्या पक्षांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. एकूणच असे दिसते की आमदार/मंत्री/खासदारांच्या नातेवाईकांना तिकिटे मिळाली आहेत. त्यामुळे कालपर्यंत नेत्यासाठी राबणार कार्यकर्ता, आज नेत्याच्या मुलामुलीसाठी, सूनेसाठी, पुतण्यासाठी, भावासाठी तर कुठे काकासाठी राबताना दिसतोय. याच स्थानिकच्या निवडणुकांमधून निवडून येणारे पुढे नेते म्हणून उदयास येतात. त्यामुळे सर्वपक्षीय वर्तमान नेत्यांना कार्यकर्ते नेते झालेले पाहवत नाही. दुसरीकडे भाजप या सगळ्यात इतका आक्रमक झाला आहे की इतर पक्षातील नेत्यांना, ड्रग्स प्रकरणातील आरोपीला एवढेच काय तर पालघर साधू हत्याकांडात भाजपने ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच पक्षात प्रवेश देत आहे. त्यातील काहींना उमेदवारीही मिळत आहे. त्यामुळे एकनिष्ठपणे पक्षासाठी झटणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यामध्ये डावलले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ