महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार–सुप्रिया सुळे एकाच मंचावर, विकासाचा जाहीरनामा सादर
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले गेले असताना, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय चित्र पूर्णपणे वेगळे असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबत सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार, या दोन महापालिकांमध्ये मात्र भाजपविरोधात थेट निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. विशेष म्हणजे या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आलेले दिसत आहेत.
पुण्यात नुकताच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे एकाच मंचावर उपस्थित होते. या जाहीरनाम्यातून शहराच्या विकासासाठी पाच प्रमुख मुद्द्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार म्हणाले की, पुणेकरांना नळाद्वारे नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येईल, त्यासाठी नव्या उंच पाण्याच्या टाक्या उभारल्या जातील. शहर प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार असून स्वच्छतेच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना केल्या जातील. नव्या शाळांना मान्यता देणे, तसेच झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे हेही जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील, यावर विशेष भर देण्यात आला आहे.
सुरुवातीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका अजित पवार भाजपासोबत लढतील, अशी चर्चा होती. मात्र अखेरीस भाजपपासून वेगळे होत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले. राज्य पातळीवर सत्ता वेगळी असली तरी स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.
या युतीबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “अजित पवार आणि माझ्यातील कौटुंबिक नाते कायमच सुसंवादी राहिले आहे. राजकीय मतभेद कालही होते आणि आजही आहेत. मात्र, महापालिका निवडणुकीत अनेक पक्ष अशा प्रकारच्या स्थानिक युती करतात,” असे त्यांनी सांगितले. या घडामोडींमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकीत यंदा राजकीय लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.




