नवी मुंबई : विजय गायकवाड
नवी मुंबईच्या (Navi Mumbai) सार्वत्रिक निवडणुका असल्याने अनेक उमेदवारांना आपल्या पक्षाकडून एबी फॉर्म मिळणार याबाबत निश्चित होते. परंतु येथील शिवसेनेचे नेते, उपनेते यांनी आपल्या घरातील व निकटवर्तीय यांनाच उमेदवारी दिल्याने अनेक उमेदवार नाराज झाले असून नवी मुंबईतील शिवसेचे उपजिल्हा प्रमुख गणेश नारायण म्हात्रे यांनी आपल्या पदाचा मंगळवार दि. 2 रोजी प्रसारमाध्यमांसमोर शिवसेना पक्षाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
त्यासोबतच कार्यालयातील शिवसेना नेत्यांच्या तसबिरी देखील उतरवून ठेवल्या प्रसारमाध्यमांशी बोलताना गणेश म्हात्रे (Ganesh Mhatre) म्हणाले की, “मी गेल्या 25 वर्षात राजकारणात सक्रिय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून मी काम करण्यास सुरुवात केल्यानंतर मी समजपयोगी अशी कामे सुरु केली. रिक्षा चालक सेनेची युनियन सुरु केली. अशाच प्रकारे कार्य करत असताना मनसेतील पदाधिकाऱ्यांनी माझी कुचबना केली त्यामुळे मी मनसेतील कामगार सेनेच्या राज्य उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन सेनेत उप नेते विजय चौगुले यांच्या उपस्थिती मध्ये दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्षात प्रवेश केला. कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण या सूत्रावर काम करीत असताना वरिष्ठानी माझ्या कामाची दखल घेऊन माझ्या प्रभागातून मनपा निवडणुकीची उमेदवारी देण्याचे आश्वासन मला देण्यात आले.मात्र पक्षाने कॉग्रेस पक्षातून आलेल्या भ्रष्ट म्हात्रे कुटुंबाला आपल्या मांडीवर बसवून घेतले.व माझा उमेदवारीचा पत्ता कट केला. ज्या वेळी मी सेनेत प्रवेश केला त्यावेळी खासदारकीला नरेश म्हस्के निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी मी त्यांना माझ्या प्रभागातून गोठीवली गावातून 1800/2000 एवढे मत मिळवून दिली. माझ्या कार्याची दखल ना उपनेत्याने घेतली ना जिल्हा प्रमुखांनी घेतली. यामुळे मी व माझे सहकार्यानी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा देत आहोत.” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.




