spot_img

Navi Mumbai News : दिवाळे कोळीवाड्यात रंगली पारंपरिक लंगोटी क्रिकेट स्पर्धा!

spot_img

आधुनिकतेच्या लाटेत अनेक पारंपरिक चालीरीती लोप पावत असल्या तरी, नवी मुंबईतील दिवाळे कोळीवाडा येथे मात्र परंपरा आणि उत्साह यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. होळी उत्सवानिमित्त सोमवारी (ता. ०२) रोजी भव्य ओव्हरआर्म लंगोटी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावच्या मातीत खेळल्या जाणाऱ्या या आगळ्यावेगळ्या स्पर्धेने परिसरात सणासुदीचा उत्साह अधिकच पाहायला मिळाला. क्रिकेट क्षेत्रातील प्रसिद्ध पंचांच्या उपस्थितीत सामने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

या स्पर्धेत दिवाळे कोळीवाड्यातील तब्बल १३ संघांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे सर्व खेळाडूंनी डोक्यावर लाल टोपी आणि कमरेला सुरका (लंगोटी) परिधान करून पारंपरिक कोळी वेशभूषेत सामने खेळले. त्यामुळे स्पर्धेला खऱ्या अर्थाने पारंपरिक रंगत प्राप्त झाली. आगरी-कोळी समाजाचा उत्सवप्रिय स्वभाव आणि आपल्या संस्कृतीबद्दलची जपणूक या स्पर्धेतून प्रकर्षाने दिसून आली. विशेष म्हणजे संपूर्ण ठाणे जिल्ह्यात लंगोटी घालून खेळली जाणारी ही एकमेव स्पर्धा असल्याने पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

यंदाच्या होळी चषक स्पर्धेत संघ सहभागी झाले होते. मे. अक्षय डेव्हलपर्सचे सोमनाथ देवकर यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या स्पर्धेचे १८वे वर्ष असून, सातत्याने परंपरा जपत ही स्पर्धा आयोजित केली जाते. “अशा स्पर्धांमुळे नवतरुणांना प्रेरणा मिळते आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळावे यासाठी मैदानी खेळांची परंपरा जपली पाहिजे,” असे मत आयोजक सोमनाथ देवकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान, होळी निमित्त गावच्या मातीत रंगलेल्या मैदानावर खेळवली जाणारी ही लंगोटी क्रिकेट स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नसून, ती गावाच्या एकोप्याची, संस्कृतीच्या जतनाची आणि परंपरेच्या अभिमानाची साक्ष देणारी ठरली. गावच्या मातीत, पारंपरिक वेशात आणि उत्साहाच्या जल्लोषात रंगलेली ही स्पर्धा क्रिकेट रसिकांच्या मनात वर्षभराची आठवण ठेवून जाते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ