spot_img

Navi Mumbai : नवी मुंबईच्या ओल्या कचऱ्याला नवी ओळख! “हरित महासिटी कंपोस्ट”ला राज्यस्तरीय मान्यता

spot_img

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनातून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताला अधिकृत ब्रँड, शाश्वत विकासाला मोठी चालना

नवी मुंबई (Navi Mumbai) महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाला आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. शहरातील ओला कचरा आणि पालापाचोळ्यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताला महाराष्ट्र शासनाचा राज्य-नोंदणीकृत “हरित महासिटी कंपोस्ट” (Green Mahacity Compost) हा अधिकृत ब्रँड वापरण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला नवी मानांकित ओळख प्राप्त झाली आहे.

नगरविकास विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला “हरित महासिटी कंपोस्ट” हा ब्रँड शहरी ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताच्या विपणन आणि विक्रीसाठी वापरला जातो. हा ब्रँड राज्य कचरा व्यवस्थापन नियम तसेच खत नियंत्रण आदेशांतर्गत ठरवलेल्या गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पस्थळी तयार होणारे सेंद्रिय खत या सर्व मानकांवर पात्र ठरले असून, आता ते याच अधिकृत ब्रँडखाली बाजारात उपलब्ध होणार आहे.

या मान्यतेमुळे क्षेपणभूमीकडे जाणारा कचरा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होत असून, पर्यावरण संरक्षणाला चालना मिळत आहे. सेंद्रिय खताच्या वापरामुळे मातीची सुपिकता वाढते, पिकांची गुणवत्ता सुधारते आणि शाश्वत शेतीला बळ मिळते.

तुर्भे येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात दररोज साधारण ३० ते ४० मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. या खताचा वापर महापालिकेच्या उद्यानांमध्ये करण्यात येत असून, उर्वरित खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक, गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर खताचा लाभ होत आहे.

देशातील ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये समावेश असलेल्या नवी मुंबई शहरासाठी ही आणखी एक अभिमानास्पद बाब ठरली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना “हरित महासिटी कंपोस्ट” या ब्रँडमुळे नवी उंची मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ