चैत्र पौर्णिमेनिमित्त दिवाळे कोळीवाड्यातील प्राचीन हनुमान मंदिरात पारंपरिक हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे महाभिषेक, हनुमान चालीसा पठण, रामनाम जप व आरती करून विधिवत पूजा करण्यात आली. सूर्योदयाच्या वेळी भाविकांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करत पाळणा हलविण्यात आला. “संकटमोचन हनुमान की जय” आणि “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला आणि वातावरण भक्तिमय झाले.
या निमित्त मंदिराची फुलांनी आकर्षक सजावट, मूर्तीला शेंदूर लेपन तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी धार्मिक परंपरेच्या श्री संत ज्ञानेश्वर प्रासादिक भजन मंडळ, ज्ञानराज प्रासादिक भजन मंडळ, श्री पंढरीनाथ प्रासादिक महिला भजन मंडळ, श्री शिवशंकर प्रासादिक भजन मंडळ आणि शिव चिदंबरम भजन मंडळ या पारंपरिक भजनांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. तसेच आनंद सिंग यांचे सुंदरकांड आणि ब्रास बॅण्ड पथकांच्या सादरीकरणाने विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे दिवसभर उत्सवाची रंगत कायम राहिली.
तसेच संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हनुमान मंदिरापासून संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या भाविकांनी मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजरात व हरी ओम साई भजन मंडळाच्या जयघोषात ही मिरवणूक पार पडली. यावेळी, गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.
दरम्यान, भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था हनुमान सेवा संस्था व पांडुरंग पाटील यांच्यासह समस्त दिवाळे ग्रामस्थ मंडळ यांच्यावतीने करण्यात आली होती. अभिषेक व पूजेचे मानकरी म्हणून पदा फकीर आणि बामण वळकरी यांना देण्यात आला असल्याचे गावचे पाटील परशुराम पाटील यांनी यावेळी सांगितले..!




