नवी मुंबईतील दिघा (Digha) परिसरात गेल्या चार दिवसांपासून टोळीयुद्धाने भीषण रूप धारण केलं आहे. दोन गटांमध्ये सतत होणाऱ्या सशस्त्र हाणामारीमुळे स्थानिक रहिवासी प्रचंड दहशतीखाली वावरत असून, या गंभीर परिस्थितीमुळे रबाळे एमआयडीसी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अलीकडेच नवी मुंबईतील समाजसेवक दिलपाक बुद्धप्रकाश यांच्यावर अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी दोन दिवस या भागात कडक बंदोबस्त तैनात केला होता.
धक्कादायक बाब अशी की, पोलिसांनी तैनात केलेला बंदोबस्त हटवताच पुन्हा एकदा दिघा परिसरात ‘गँगवार’ सुरू झालं आहे. गेल्या 4 दिवसांपासून दोन गट आमनेसामने येत असून, भररस्त्यात कोयते आणि तलवारी नाचवत हल्ले केले जात आहेत. या गुंडगिरीमुळे सामान्य नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. परिसरात शस्त्रास्त्रांचा वापर होत असताना आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाही, अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे रबाळे एमआयडीसी पोलीस नेमके काय करत आहेत? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.




