spot_img

Navi Mumbai : हवा गुणवत्तेसाठी प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यवाहीवर भर देण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

spot_img

नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NNMC) वतीने वायु प्रदूषण नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी रस्त्यांवरील माती व धूळ कमी करणे तसेच बांधकामांच्या ठिकाणी धूळ प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक काटेकोरपणे राबविण्यावर भर देण्याचे तसेच यासाठी अभियांत्रिकी व नगररचना विभागाने प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर उतरुन अधिक गतीमान व ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मा.उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने नवी मुंबईतील काही ठिकाणांना भेटी देऊन हवामान स्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली होती व निरीक्षणे नोंदविली होती. त्या अनुषंगाने आयुक्तांनी त्या ठिकाणांसह शहरात सर्वच ठिकाणी वायू व धूळ प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी व गतीमान कराव्यात असे निर्देशित केले सर्व विभागांनी . याबाबत आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आजच सादर करण्याचे निर्देशित करतांना कार्यवाहीत सातत्य ठेवा असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. या बैठकीस शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, सहा.संचालक नगररचना श्री. सोमनाथ केकाण, अतिरिक्त शहर अभियंता श्री. अरविंद शिंदे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे, उद्यान विभागाच्या उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे तसेच सर्व विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

यापूर्वी वारंवार झालेल्या बैठकांमध्ये तसेच पाहणी दौ-यांमध्ये निर्देशित केलेल्या उपाययोजनांना अधिक प्रभावी करण्याची व त्यामध्ये नियमितता ठेवण्याचे निर्देश देतांनाच प्राधान्याने अभियांत्रिकी, नगररचना, पाणी पुरवठा, मलनि:स्सारण, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान विभागांनी याबाबतच्या कामात समन्वय ठेवावी आणि ठोस कृतिशीलता कामांतून दाखवावी असे स्पष्ट केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेली रस्ते तसेच इतर बांधकामे याठिकाणी धूळ इतरत्र उडू नये याकरिता ग्रीन नेट लावणे व कामाचा फलक लावणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ज्याठिकाणी विकासकांमार्फत बांधकाम साईट्स सुरु आहेत अशा ठिकाणी तपासणी करून महानगरपालिकेने जाहीर केलेल्या प्रदूषण प्रतिबंधात्मक मानक कार्यप्रणालीचे (SOP) काटेकोर पालन होत नसल्यास तेथे नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. त्यामधील 18 साईट्सवरील बांधकाम थांबविण्यातही आले होते. याबाबत सर्व साईट्सची पुन्हा पाहणी करुन सद्यस्थितीची माहिती घ्यावी आणि त्रुटी आढळल्यास अधिक कडक कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. विभाग स्तरावर प्रदूषण प्रतिबंधासाठी स्थापन केलेल्या समित्यांनी क्षेत्रीय पाहणी करण्यावर भर द्यावा असेही आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.

उद्याने आणि मैदाने या ठिकाणीही स्प्रिंकलर सिस्टिमव्दारे पाणी फवारुन माती उडणार नाही अशाप्रकारची कार्यवाही करावी त्यासोबतच मुख्य रस्त्यांच्या बाजूला हिरवळ निर्मितीवर भर द्यावा अशाही सूचना आयुक्तांनी दिल्या. कुठेही टाकल्या जाणा-या डेब्रिजला प्रतिबंध करण्याप्रमाणेच रस्त्यावर माती साचलेली दिसणार नाही अशाप्रकारे सखोल स्वच्छता करत रहावी असे निर्देश देण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हवा गुणवत्ता प्रमाण चांगले रहावे याकरिता सातत्यपूर्ण प्रयत्न सुरु ठेवावेत व प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन प्रतिबंधात्मक कार्यवाहीवर व उपाययोजनांवर प्राधान्याने भर द्यावा असे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आजच्या बैठकीत दिले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ