विविध राजकीय पक्ष प्रतिनिधींशी विशेष सभेव्दारे निवडणूकविषयी साधला सुसंवाद
राज्य निवडणूक आयोगामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 – 26, दि. 15 जानेवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आलेली असून त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निवडणुकीशी संबधित महानगरपालिकेचे अधिकारी तसेच पोलीस व इतर सर्व प्राधिकरणांचे अधिकारी आणि निवडणूक आयोगामार्फत नियुक्त उपजिल्हाधिकारी संवर्गातील निवडणूक निर्णय अधिकारी व तहसिलदार, नायब तहसिलदार संवर्गातील सहा.निवडणूक अधिकारी यांची विशेष बैठक घेत निवडणूक कामकाज निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी परस्पर समन्वयाने सामुहिक भावनेने काम करावे असे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, सह.पोलीस आयुक्त श्री. संजय येनपुरे, नमुंमपा निवडणूक विभागाचे उपआयुक्त श्री. भागवत डोईफोडे तसेच इतर प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित होते.
राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या विशेष बैठकीतून निवडणूक विषयक व आचारसंहिता नियमांबाबत माहिती प्रसारण
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची विशेष बैठक घेऊन आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी निवडणूक विषयक संपूर्ण माहिती देत आचार संहितेच्या नियमांचे काटेकोर पालन करुन निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थित रितीने पार पाडण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना सुयोग्य उत्तरे देऊन शंका समाधान केले. यावेळी प्रथमत:च एका प्रभागात चार सदस्य अशाप्रकारे बहुसदस्यीय पध्दतीने निवडणूक होत असल्याने एका मतदाराला आपल्या प्रभागातील अ,ब,क,ड अशा चार उमेदवारांना मतदान करावयाचे आहे याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याकरिता आपल्यामार्फतही नागरिकांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पत्रकार परिषदेतून माध्यम प्रतिनिधींशी निवडणूक विषयक सुसंवाद – सहकार्याचे आवाहन
विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी नमुंमपा निवडणूकीविषयी सुसंवाद साधतांना आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निवडणूक कार्यक्रमाची संपूर्ण माहिती दिली. नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक गुरुवार दि. 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायं.5.30 यावेळेत होणार असून मतमोजणी शुक्रवार दि. 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 पासून होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. याकरिता 01 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली असल्याची सांगत दि.23 डिसेंबर 2025 ते 29 डिसेंबर 2025 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 तसेच 30 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील असे त्यांनी सांगितले. दि.25 डिसेंबर व 28 डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्रे देण्यात व स्विकारण्यात येणार नाहीत असे त्यांनी नमूद केले.
दि.31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वा. पासून नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून त्यानंतर लगेचच वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दि.02 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 03 या वेळेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असून दि.03 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 नंतर निवडणूक चिन्ह नेमून दिले जाणार आहे. दि. 03 जानेवारी रोजीच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे व 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे असे त्यांनी सांगितले. नमुंमपा निवडणूक 111 सदस्य संख्येकरिता होत असून 28 प्रभाग झालेले आहेत. त्यामध्ये 27 प्रभाग हे 4 सदस्यीय असून एक प्रभाग 3 सदस्यीय आहे. एकुण 9,48,460 इतकी एकूण मतदार संख्या असून त्यामध्ये 5,16,267 पुरुष व 4,32,040 इतके स्त्री मतदार आणि 153 इतर मतदार आहेत. यावेळी चार सदस्यीय प्रभाग असल्याने एका मतदारास चार सदस्यांना मतदान करावयाचे आहे, यादृष्टीने एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 800 ते 850 मतदार असतील याकडे लक्ष देण्यात आलेले आहे. एकूण 28 प्रभागांसाठी 1141 इतकी मतदान केंद्रे कार्यान्वित असणार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे रितीने पार पाडण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज असून या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या 6275 कर्मचा-यांचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी यावेळी दिली.
निवडणूकीकरिता आठ विभाग क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापित करण्यात आली असून प्र.क्र 1,2,3 करिता माता बाल रुग्णालय इमारत दिघा या ठिकाणी व प्र.क्र 4,5,7 करिता सरस्वती विद्यालय से.5 ऐरोली याठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय असणार आहे. प्र.क्र.6,8,9 करिता समाजमंदिर हॉल. भूखंड क्र 10, से. 07 घणसोली आणि प्रक्र 10,11,12,13 करिता आण्णासाहेब पाटील सभागृह, पहिला मजला, से. 05 कोपरखैरणे येथे कार्यालय असणार आहे. प्र.क्र. 14,15,19,20 याकरिता आण्णाभाऊ साठे समाजमंदिर, प्लॅट नं 187 से.10 सानपाडा आणि प्र.क्र. 16,17,18 करिता जलतरण तलाव संकुल, भूखंड क्र 196 से.12 वाशी या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय आहे. प्र.क्र. 21,22,23,24 करिता आगरी कोळी भवन, प्लॅाट नं 12, से.24, नेरुळ याठिकाणी तसेच प्र.क्र. 25,26,27,28 करिता ए विभाग कार्यालय बेलापूर भवन, से.11, सीबीडी बेलापूर येथे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करताना आवश्यक असणारी मालमत्ता कर, पाणीपट्टी तसेच इतर ना हरकत प्रमाणपत्रे एक खिडकी योजनेनुसार संबधित विभाग कार्यालय पातळीवरुन एकाच ठिकाणाहून देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने अनाधिकृत बॅनर्स विरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली असून महानगरपालिकेच्या मालमत्तांसह शासकीय कार्यालये व इमारती तसेच सार्वजनिक व खाजगी जागांवरील राजकीय मजकूर हटविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या मालमत्तांवरील उद्घाटन – भूमिपूजनाच्या कोनशिला तसेच राजकीय व्यक्तींची नावे असलेले फलक झाकून घेण्याची कार्यवाही तत्परतेने करण्यात आलेली आहे. निवडणूक प्रक्रिया सुनियोजित रितीने पार पाडण्यासाठी महानगरपालिकेच्या विभाग प्रमुखांना निवडणूक कामांच्या अनुषंगाने समन्वय अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली असून आवश्यक कामे करण्याकरिता कर्मचारीवर्गही उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आचार सहिता अंमलबजावणी कक्षाचे समन्वयक अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार काम पाहणार असून कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षा आराखडयाचे काम अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे पाहणार आहेत. मिडीया सेल व एमसीएमसी कमिटीचे समन्वयक अधिकारी म्हणून मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे काम पाहणार असून निवडणूक खर्च विषयक कामकाजाची जबाबदारी मुख्य लेखा परीक्षक श्री. राजेंद्र गाडेकर यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. अशाप्रकारे सर्व विभाग प्रमुख अधिका-यांकडे निवडणूक विषयक विविध कामांच्या जबाबदा-या सोपविण्यात आलेल्या आहेत.
या सर्वांच्या एकत्रित सहयोगातून नमुंमपा निवडणूक सुव्यवस्थित रितीने पार पडतील असा विश्वास व्यक्त करीत महापालिका आयुकत डॉ. कैलास शिंदे यांनी सर्व प्रसार माध्यमांनी मतदान करण्याचा संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सक्रीय योगदान द्यावे व एका व्यक्तीस बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीनुसार 28 प्रभागांपैकी 27 प्रभागांत चार वेळा व एका प्रभागात तीन वेळा मतदान करावयाचे आहे. ही माहितीही जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन माध्यम प्रतिनिधींना केले.




