कोरडी त्वचा, केमिकल्स आणि साईड इफेक्ट्सपासून सुटका; घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करा स्किन-फ्रेंडली साबण
आजकाल स्किन केअरच्या नावाखाली बाजारात असंख्य साबण, फेसवॉश आणि क्लिन्झर्स उपलब्ध आहेत. महागडे प्रोडक्ट वापरूनही अनेक जण तक्रार करतात की त्वचा कोरडी होते, ओढल्यासारखी वाटते किंवा उलट रॅशेस, खाज यांसारख्या समस्या निर्माण होतात. काही साबण रंग उजळवण्याच्या नावाखाली वापरले जातात, मात्र त्यामधील केमिकल्स त्वचेसाठी घातक ठरू शकतात.
अशा परिस्थितीत, बदलत्या ऋतूत आणि प्रदूषणात त्वचा सुरक्षित, मऊ आणि नैसर्गिकरीत्या चमकदार ठेवायची असेल, तर घरच्या घरी नैसर्गिक घटकांपासून साबण बनवणं हा उत्तम पर्याय ठरू शकतो. या साबणाचा कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि तुम्ही एकाच वेळी अनेक साबण तयार करू शकता.
घरगुती साबणासाठी लागणारे साहित्य:
- 2 ते 3 चमचे बदाम तेल किंवा नारळाचे तेल
- 1 चमचा ग्लिसरीन
- 2 चमचे कोरफडीचे जेल
- अर्धा चमचा हळद
- 8 ते 10 कडुलिंबाची पाने
- मूठभर गुलाबाच्या पाकळ्या
- 250 ग्रॅम साबणाचा बेस
- सुगंधासाठी आवश्यक तेल (टी ट्री, लॅव्हेंडर किंवा आवडीनुसार) साबण बनवण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत:
सर्वप्रथम कडुलिंबाची पाने बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्वच्छ कापडात ठेवून त्यातील रस वेगळा काढा. इच्छ असल्यास कडुलिंबाची पावडरही वापरता येते.
यानंतर गुलाबाच्या पाकळ्या वाटून त्याचा रस काढा किंवा गुलाबपाकळ्यांची पावडर तयार करा.
आता गॅसवर एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. साबणाच्या बेसचे छोटे तुकडे करून डबल बॉयलर पद्धतीने हा बेस पूर्णपणे वितळवा.
वितळलेल्या साबणाच्या बेसमध्ये गुलाबाचा रस किंवा पावडर आणि कडुलिंबाचा रस किंवा पावडर टाका. मिश्रण नीट ढवळा.
यानंतर त्यात कोरफडीचे जेल, बदाम किंवा नारळाचे तेल, ग्लिसरीन आणि हळद घालून सर्व घटक एकसारखे मिसळा.
शेवटी तुमच्या आवडीचं सुगंधी आवश्यक तेल घाला. यामुळे साबणाला छान नैसर्गिक सुगंध येईल आणि त्वचेलाही फायदा होईल.
हे तयार मिश्रण सिलिकॉन साबणाच्या साच्यात ओता आणि काही तास तसेच ठेवा, जेणेकरून साबण नीट सेट होईल.
साबण घट्ट झाल्यानंतर साच्यातून बाहेर काढा आणि वापरण्यासाठी तयार ठेवा.
या साबणाचे त्वचेसाठी फायदे:
- बदाम व नारळ तेल त्वचेला पोषण देतात
- कोरफड त्वचेला खोलवर हायड्रेशन देते
- ग्लिसरीन त्वचा मऊ आणि ओलसर ठेवते
- हळद त्वचेचा रंग उजळवण्यास मदत करते
- कडुलिंब त्वचेवरील बुरशीजन्य संसर्ग टाळतो
- गुलाब त्वचेला ताजेपणा आणि नैसर्गिक चमक देतो
हा घरगुती साबण नियमित वापरल्यास त्वचा नैसर्गिकरीत्या मऊ, स्वच्छ आणि चमकदार राहण्यास मदत होते — तेही कोणत्याही केमिकल्सशिवाय.




