हार्मोनल बदलांमुळे त्वचेत होणारे त्रास कमी करण्यासाठी जाणून घ्या नैसर्गिक आणि सोप्या टिप्स
गरोदरपणाच्या काळात शरीरात मोठ्या प्रमाणात हार्मोनल बदल होतात. याचा थेट परिणाम त्वचेवर दिसून येतो. काही महिलांची त्वचा अधिक उजळते, तर काहींना पिगमेंटेशन, कोरडेपणा, मुरुम किंवा स्ट्रेच मार्क्सचा त्रास जाणवतो. अशा वेळी बाजारातील रसायनयुक्त उत्पादने वापरणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या काळात नैसर्गिक आणि सुरक्षित उपायांचा अवलंब करणे अधिक फायदेशीर मानले जाते.
नैसर्गिक क्लिन्झिंग महत्त्वाचे
गरोदरपणात त्वचा अधिक संवेदनशील बनते. त्यामुळे तीव्र केमिकल्स असलेले साबण किंवा फेसवॉश टाळावेत. घरच्या घरी तयार केलेले बेसन आणि दूध यांचे मिश्रण सौम्य क्लिन्झर म्हणून वापरता येते. यामुळे त्वचा स्वच्छ राहते आणि नैसर्गिक चमकही टिकून राहते.
भरपूर पाणी आणि मॉइश्चरायझिंग आवश्यक
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी शरीर हायड्रेटेड असणे खूप गरजेचे आहे. दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी पिल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. तसेच नारळ तेल, कोको बटर किंवा व्हिटॅमिन ई ऑईलने हलका मसाज केल्यास त्वचा मऊ आणि लवचिक राहते.
फेसपॅकने वाढवा नैसर्गिक ग्लो
चेहऱ्यावर ताजेपणा आणि उजळपणा टिकवण्यासाठी मुलतानी माती, बेसन आणि दही यांचा फेसपॅक उपयुक्त ठरतो. डाग-डिपिंगसाठी कोरफडीचे जेल वापरता येते. टॅनिंग कमी करण्यासाठी गुलाबपाणी नैसर्गिक टोनर म्हणून फायदेशीर ठरते.
स्ट्रेच मार्क्ससाठी घरगुती उपाय
गरोदरपणात पोट, मांड्या आणि स्तनांवर स्ट्रेच मार्क्स दिसणे सामान्य आहे. रोज नारळ तेल किंवा तूप लावल्यास त्वचा पोषण मिळते आणि मार्क्स कमी दिसू लागतात. त्वचा सतत ओलसर ठेवणे महत्त्वाचे आहे.
उन्हापासून संरक्षण आवश्यक
बाहेर जाताना किमान SPF 30 असलेले सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे. झिंक ऑक्साईड किंवा टायटॅनियम डायऑक्साइड असलेले सनस्क्रीन सुरक्षित मानले जातात.
काय टाळावे?
गरोदरपणात कृत्रिम सुगंध असलेले मेकअप प्रॉडक्ट्स, लेसर उपचार तसेच रेटिनॉल, सॅलिसिलिक ॲसिड आणि पॅराबेन्स असलेली सौंदर्य उत्पादने वापरणे टाळावे. यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. योग्य काळजी आणि नैसर्गिक उपायांच्या मदतीने गरोदरपणातही त्वचा निरोगी आणि तेजस्वी ठेवता येते.




