भाजपच्या हिमगौरी आडके (Himgauri Adke) या नाशिकच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे. अशातच आता हिमगौरी आडके यांच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हिमगौरी आहेर-आडके या भाजपचे चांदवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल आहेर यांच्या चुलत बहिण आहेत. राहुल आहेर यांचे वडील दिवंगत डॉ. डी. एस. आहेर हे भाजपचे कट्टर आणि निष्ठावान नेते म्हणून ओळखले जात होते. नाशिक विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आमदार तसेच खासदार अशी दोन्ही महत्त्वाची पदे भूषवली होती. याशिवाय राज्याचे आरोग्यमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.
भाजपच्या सुरुवातीच्या टप्प्यात, जेव्हा पक्षाचा राज्यात फारसा प्रभाव नव्हता, त्या काळापासून आहेर कुटुंब पक्षासोबत ठामपणे उभे राहिले. डॉ. डी. एस. आहेर यांचा तोच राजकीय वारसा त्यांचे पुत्र राहुल आहेर पुढे नेत असून, चांदवड मतदारसंघातून त्यांनी सलग तिसऱ्यांदा आमदारकी मिळवत हॅट्रिक साधली आहे. हिमगौरी आहेर-आडके यांच्या महापौरपदाच्या निवडीत राहुल आहेर यांचे राजकीय वजन उपयोगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. डॉ. राहुल आहेर यांनी विधानसभा निवडणुकीत हॅट्रिक साधल्यानंतर प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना मंत्रीपदाचा शब्द दिल्याची चर्चा होती. मात्र तो शब्द अद्याप पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत शहराच्या राजकारणात आहेर कुटुंबाला महत्त्व देत भाजपने हिमगौरी आडके यांना महापौरपदाची संधी दिल्याचे मानले जात आहे. याचवेळी उपमहापौरपदावर बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांना संधी देत भाजपने पंचवटी परिसरातील राजकीय समतोलही साधला आहे.




