राज्यातील २९ महापालिकांचे निकाल शुक्रवारी (१६ जानेवारी) जाहीर झाले. मात्र या निकालांनी नाशिक (Nashik) मधील तीन महिला आमदारांसाठी मोठा राजकीय धक्का दिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रचाराची जबाबदारी, संघटनात्मक ताकद आणि प्रतिष्ठेची लढत असूनही अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांच्या नेतृत्वावर आणि भविष्यातील राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महापालिका निवडणुकीत प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती होऊनही देवयानी फरांदे यांना पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसला. पक्षप्रवेशांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्यावर उघडपणे व्यक्त झालेली नाराजी अखेर निकालात दिसून आली. मध्य मतदारसंघात भाजपच्या हक्काच्या चार जागांवर पराभव पत्करावा लागल्याने पक्षाचा टक्का घसरला. याशिवाय पारंपरिक प्रतिस्पर्धी शाहू खैरे, वसंत गिते आणि विनायक पांडे यांच्या विजयामुळे विरोधकांची ताकद अधिक वाढली. पक्षाच्या धोरणामुळे स्वतःच्या मुलाची उमेदवारी मागे घ्यावी लागणे आणि ज्येष्ठ आमदार म्हणून शहरव्यापी नेतृत्व सिद्ध करण्यात आलेले अपयश यामुळे फरांदे यांचा प्रभाव मर्यादित गटापुरताच राहिला.
वरिष्ठांविरोधात व्यक्त झालेली नाराजीही त्यांना भोवली. आता मतदारसंघातच आव्हाने वाढली असून शिंदेसेनेचे अजय बोरस्ते, भाजपचेच शाहू खैरे व विनायक पांडे, उद्धवसेनेचे वसंत गिते आणि राष्ट्रवादीच्या हेमलता पाटील यांच्या विजयामुळे आगामी काळ अधिक कठीण ठरण्याची शक्यता आहे.




