महापालिका निवडणुका तोंडावर असताना भाजपमध्ये वाढले इनकमिंग; हिना गावित यांनी स्पष्ट केली नंदुरबार आणि अक्कलकुव्यात शिंदे गटाशी युती नाही
महापालिकेच्या निवडणुका अगदी दारात येऊन ठेपल्या असताना नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील कुकडखुंट गावात शिवसेना (शिंदे गट) चे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक कार्यकर्त्यांनी माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे.
या घडामोडीला शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांना मोठा धक्का मानला जात आहे. हिना गावित यांच्या पुनरागमनानंतर भाजपला स्थानिक पातळीवर नवे बळ मिळत असून, केवळ शिंदे गटच नव्हे तर काँग्रेसमधील अनेक कार्यकर्तेही भाजपचा झेंडा हातात घेत आहेत.
अक्कलकुवा आणि धडगाव परिसरात मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केला. “येत्या काळात आणखी अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होतील,” असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, हिना गावित यांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर महत्त्वाचे वक्तव्य करताना सांगितले की, नंदुरबार आणि अक्कलकुवा या मतदारसंघांत भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती होणार नाही. या दोन्ही ठिकाणी भाजपची मुख्य लढत शिंदे गटाशीच होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तथापि, शहादा आणि तळोदा मतदारसंघातील युतीचा निर्णय स्थानिक आमदार राजेश पाडवी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. “जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला दिला आहे,” असे त्या म्हणाल्या.
एकूणच, नंदुरबार जिल्ह्यात भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असताना, महायुतीत मात्र दरी वाढल्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी निवडणुकीपूर्वी हा बदल जिल्ह्याच्या राजकारणात निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




