spot_img

Nana Patekar Leaves O Romeo Trailer Launch : ‘ओ रोमियो’ ट्रेलर लाँचमध्ये नाना पाटेकरांचा अचानक एक्झिट

spot_img

वेळेच्या शिस्तीवर ठाम असलेल्या नानांच्या भूमिकेला नेटकऱ्यांचा पाठिंबा

विशाल भारद्वाज दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘ओ रोमियो’च्या ट्रेलर लाँचचा कार्यक्रम नुकताच मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात नाना पाटेकर, शाहिद कपूर, तृप्ती डिमरी आणि ज्येष्ठ अभिनेत्री फरीदा जलाल उपस्थित राहणार होते. मात्र कार्यक्रमादरम्यान घडलेल्या एका अनपेक्षित घटनेमुळे हा ट्रेलर लाँच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.

कार्यक्रम सुरू असतानाच नाना पाटेकर (Nana patekar) अचानक सभागृहातून निघून गेल्याचं पाहायला मिळालं. ‘ओ रोमियो’ (O Romeo) मध्ये नानांची भूमिका महत्त्वाची असतानाही त्यांनी अशा पद्धतीने कार्यक्रम अर्धवट सोडल्यामुळे अनेक तर्कवितर्क सुरू झाले. नाना इतके नाराज का झाले, असा प्रश्न नेटकऱ्यांकडून विचारला जाऊ लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर हे नेहमीच वक्तशीरपणासाठी ओळखले जातात. ट्रेलर लाँचसाठी ते ठरलेल्या वेळेत कार्यक्रमस्थळी पोहोचले होते. मात्र चित्रपटातील प्रमुख कलाकार शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी कार्यक्रमस्थळी तब्बल तासभर उशिरा पोहोचले. वेळेच्या शिस्तीला प्रचंड महत्त्व देणाऱ्या नानांना ही प्रतीक्षा न रुचल्याने त्यांनी कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

नाना पाटेकर निघून गेल्यानंतर कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी मंचावर येत संपूर्ण घटनेवर खुलासा केला. माध्यमांशी बोलताना विशाल भारद्वाज म्हणाले की, नाना पाटेकर हे त्यांच्या स्वभावाने थोडे हटके आहेत, पण तेवढेच मनमोकळे आणि मनोरंजकही आहेत. गेली २७ वर्षे ओळख असूनही ‘ओ रोमियो’ हा त्यांचा पहिलाच एकत्रित चित्रपट असल्याचंही त्यांनी सांगितलं.

विशाल भारद्वाज पुढे म्हणाले की, आम्ही नानांना जवळपास तासभर थांबवलं, त्यामुळे त्यांनी आपल्या खास शैलीत शांतपणे कार्यक्रम सोडला. त्यांच्या या वागण्याचं आम्हाला वाईट वाटत नाही, कारण हीच त्यांची ओळख आहे. नाना उपस्थित राहिले असते, तर आनंदच झाला असता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विशाल भारद्वाज यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या. अनेकांनी नाना पाटेकर यांच्या भूमिकेचं समर्थन केलं. काहींनी, “वेळेची किंमत कोणालाच नाही, मी नानांच्या बाजूने आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. तर काही युजर्सनी नानांचा आत्मसन्मान आणि स्टारडमकडे असलेली उदासीनता अधोरेखित करत, “नाना पाटेकर यांनी मोठ्या दिग्दर्शकांचेसुद्धा चित्रपट नाकारले आहेत, त्यांना प्रसिद्धीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा आहे,” असं मत व्यक्त केलं. एकूणच, एका ट्रेलर लाँच कार्यक्रमातून निघालेला हा प्रसंग सध्या बॉलिवूडमधील शिस्त, वेळेचं भान आणि स्टार संस्कृतीवर नव्याने चर्चा घडवून आणतो आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ