spot_img

Nagpur : दावोसनंतर विदर्भासाठी सुवर्णसंधी; नागपुरात महिंद्राची 15 हजार कोटींची गुंतवणूक

spot_img

‘ॲडव्हांटेज विदर्भ 2026’चा शुभारंभ, औद्योगिक विकासासोबत नदीजोड प्रकल्पालाही गती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक मिळवली असून त्याचा थेट फायदा विदर्भाला होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये ‘ॲडव्हांटेज विदर्भ 2026 : खासदार औद्योगिक महोत्सव’चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

यावेळी बोलताना फडणवीस यांनी विदर्भात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर ऑटोमोबाईल उद्योग येत असल्याची घोषणा केली. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी नागपुरात तब्बल 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून येथे नेक्स्ट जनरेशन ईव्ही आणि इतर वाहननिर्मितीसाठी भव्य प्लांट उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे उत्पादन 2028 पासून सुरू होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर या उद्योगासाठी आवश्यक सप्लाय युनिट संभाजीनगरमध्ये उभारले जाणार आहे.

गेल्या दहा वर्षांत विदर्भाचा औद्योगिक चेहरा बदलला असल्याचा दावा करत मुख्यमंत्री म्हणाले की, याआधी गडचिरोली आणि विदर्भातील खनिज संपत्तीवर फक्त चर्चा होत होत्या, पण 2014 नंतर प्रत्यक्ष कृती सुरू झाली. गडचिरोली आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये आता मजबूत औद्योगिक परिसंस्था उभी राहत आहे. येथे ग्रीन स्टील उत्पादन करून चीनपेक्षाही स्वस्त स्टील तयार करून दाखवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्यात औद्योगिक विकासासाठी ‘मॅग्नेट’ केंद्रे तयार केली जात असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, आधी फक्त मुंबई-ठाणे औद्योगिक केंद्र होते. आता रायगड, संभाजीनगर, नागपूर, अमरावती यांसारखी नवी औद्योगिक केंद्रे विकसित केली जात आहेत. टाटा एरोस्पेस लवकरच नागपुरात सेंटर ऑफ एक्सीलन्स उभारणार असून, औद्योगिक विस्तारासाठी नागपुरात आणखी पाच हजार हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे.

यासोबतच, अमरावतीमध्ये आशियातील सर्वात मोठे एव्हिएशन स्कूल उभारले जात असून त्याचे उद्घाटन जुलै महिन्यात होणार आहे. गडचिरोलीत विमानतळाचे काम सुरू असून ते ‘गेटवे टू साऊथ इंडिया’ म्हणून विकसित केले जाईल.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विदर्भासाठी महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाचीही घोषणा केली. भंडाऱ्यातील वैनगंगा नदीला बुलढाण्यातील नळगंगा नदीशी जोडण्यासाठी सुमारे 500 किलोमीटर लांबीची कृत्रिम नदी तयार केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना सिंचन व पिण्याच्या पाण्याचा मोठा फायदा होणार असून पाणीआधारित उद्योगांनाही चालना मिळेल. या प्रकल्पाचे काम याच वर्षी सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

दावोस परिषदेतून राज्यासाठी सुमारे 30 लाख कोटींची तर विदर्भासाठी साडेतीन ते चार लाख कोटींची गुंतवणूक मिळाल्याचे सांगत, त्यातील मोठा वाटा मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ