पोलिसांवरही हल्ला; बिष्णोई गँगशी कनेक्शन असल्याचा संशय, एकाला अटक तर दुसरा फरार
मुंब्रा-कौसा परिसरात आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूंसर आणि बांधकाम व्यावसायिक नदीम मोइनुद्दीन खान उर्फ ‘बाबा खान’ यांच्या घराबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी पाच राऊंड फायरिंग केली. धक्कादायक म्हणजे, आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही हल्लेखोरांनी दोन राऊंड गोळ्या झाडल्या, ज्यात दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या काळसेकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मुंब्रा पोलिसांनी या घटनेचा अत्यंत शिताफीने पाठलाग करून शहाबाज उर्फ शंभू मुन्ना शमशाद कुरेशी (२८) या आरोपीला अटक केली आहे, तर त्याचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीकडून शस्त्रासह चार मॅक्झिन जप्त करण्यात आल्या आहेत. या हल्ल्यामागे कुख्यात ‘बिष्णोई टोळी’चे धागेदोरे आहेत का? यादृष्टीने पोलीस कसून तपास करत आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी शहाबाज हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर दिल्लीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याने यापूर्वी तिहार तुरुंगात आठ वर्षे शिक्षाही भोगली आहे.
सध्या नदीम खान यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. भरवस्तीत आणि पोलिसांवर झालेल्या या धाडसी गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गोळीबाराचे नेमके कारण काय? नदीम खान यांच्या व्यावसायिक वादातून हा हल्ला झाला की आणखी काही कारण आहे, याचा सविस्तर तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.




