पौष्टिकतेचा खजिना असलेल्या मशरूममुळे काही लोकांना ऍलर्जी व पचनाच्या तक्रारी वाढू शकतात – तज्ज्ञांचा इशारा
आजच्या आरोग्यदायी आहारात मशरूमला विशेष स्थान मिळालं आहे. कमी कॅलरी, जास्त प्रथिने आणि भरपूर जीवनसत्त्वांमुळे सूप, स्टिर-फ्राय, सॅलड किंवा पिझ्झामध्ये मशरूम मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. मात्र, हे पौष्टिक अन्न काही लोकांसाठी धोकादायक ठरू शकते, कारण काहींना मशरूमची ऍलर्जी होण्याची शक्यता असते.
तज्ज्ञांच्या मते, मशरूममध्ये असलेली काही प्रथिने मोल्ड किंवा बुरशीजन्य एलर्जीनशी क्रॉस-रिअॅक्ट होऊ शकतात. त्यामुळे संवेदनशील व्यक्तींमध्ये खाज सुटणे, अंगावर पुरळ येणे, सूज, नाक वाहणे किंवा श्वास घेण्यास त्रास होण्यासारखी लक्षणे दिसू शकतात. लागवड केलेले आणि वन्य मशरूम – दोन्ही प्रकारांमध्ये एलर्जेनिक घटक आढळतात, मात्र जंगली मशरूममध्ये त्याचे प्रमाण तुलनेने अधिक असू शकते.
या लोकांनी मशरूम खाण्याबाबत विशेष काळजी घ्यावी:
ऍलर्जी असलेले लोक: ज्यांना आधीपासून अन्न किंवा बुरशीजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे, त्यांनी मशरूम टाळणे योग्य ठरते.
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले: मधुमेह किंवा इम्युनिटी कमी असलेल्या व्यक्तींमध्ये संसर्ग किंवा ऍलर्जीचा धोका वाढू शकतो.
पचनाच्या तक्रारी असलेले: गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांनी जास्त प्रमाणात मशरूम खाल्ल्यास समस्या वाढू शकतात.
गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला: आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, या काळात मशरूम सेवन टाळणे अधिक सुरक्षित मानले जाते.
दुसरीकडे, मशरूम हे पोषणमूल्यांनी भरलेले अन्न आहे. त्यामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन B-कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन D, पोटॅशियम, सेलेनियम आणि लोह मुबलक प्रमाणात असते. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी आणि शाकाहारी लोकांसाठी मशरूम हा उत्तम पर्याय मानला जातो.
मशरूममधील बीटा-ग्लुकॅन आणि अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. नियमित आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास सर्दी-खोकला, हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते. तसेच फायबरमुळे पचनसंस्था सुधारते, तर पोटॅशियममुळे स्नायू आणि मज्जासंस्थेचे कार्य योग्य राहते.
मात्र, मशरूम खरेदी करताना आणि शिजवताना काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ खात्रीशीर व खाद्य प्रकारचे मशरूमच वापरावेत, कारण काही जंगली मशरूम विषारी ठरू शकतात. योग्य प्रमाणात आणि नीट शिजवलेले मशरूम आहारात समाविष्ट केल्यास आरोग्यास मोठा फायदा होतो.




