मुंबई–पुण्यात युतीसाठी चर्चा सुरू; मात्र अजित पवार गटासोबत गेले तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती नाही, सचिन अहिर यांचा इशारा
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार असल्याने सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील संभाव्य युती आणि नव्या आघाड्यांबाबत दररोज नवी समीकरणं समोर येत आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) ने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) (Sharad Pawar) पक्षासोबतच्या युतीबाबत आपली भूमिका ठामपणे मांडली आहे.
ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मुंबई आणि पुणे महापालिकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवण्याबाबत सध्या सकारात्मक चर्चा सुरू आहे. या चर्चांचा पुढील टप्पा म्हणून उद्या पुण्यात दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर शुक्रवारी वाय. बी. चव्हाण केंद्रात आणखी एक महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात युतीचं स्वरूप, जागावाटप आणि निवडणूक रणनीतीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या दोन पक्षांतील चर्चांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) तिन्ही पक्षांची एकत्र बैठक घेण्याचा मानस असल्याचंही सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं. मनसेसोबत प्राथमिक पातळीवर जागावाटपाबाबत चर्चा आधीच सुरू असून, तिन्ही पक्ष मिळून पुढील राजकीय डावपेच ठरवतील, असे संकेत त्यांनी दिले.
मात्र, याचवेळी ठाकरे गटाने एक महत्त्वाची अट समोर ठेवली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत जाण्याचा निर्णय घेतला, तर अशा परिस्थितीत ठाकरे गट शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही, असे स्पष्ट मत सचिन अहिर यांनी मांडले.
एकीकडे युतीच्या चर्चांना वेग येत असताना, दुसरीकडे अटी-शर्ती आणि राजकीय सीमारेषाही ठळक होताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील इतर महापालिकांमध्ये अंतिम युती कोणासोबत होणार आणि त्याचा फॉर्म्युला काय असेल, हे पुढील काही दिवसांत होणाऱ्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यातील हालचालींकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.




