ईव्हीएम गैरव्यवहार, पैशांचा सत्तेसाठी वापर आणि राजकीय फितुरीमुळे महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
मुंबईसह राज्यातील अनेक महानगरपालिका निवडणुकांमध्ये लोकशाहीचा विजय न होता सत्ताधाऱ्यांनी तो पद्धतशीरपणे हिरावून घेतल्याचा आरोप शिवसेनेच्या ‘सामना’तील ‘रोखठोक’ सदरातून करण्यात आला आहे. भाजप आणि शिंदे गटाने मिळून निवडणूक प्रक्रियेला विकृत स्वरूप दिले असून पैशांच्या जोरावर सत्ता मिळवण्याचा खेळ सुरू असल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
मुंबईत शिवसेना-मनसेची सत्ता आली नसली तरी, विरोधी पक्षांचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजपच्या सत्तेवर काही प्रमाणात अंकुश राहिल्याचे नमूद करण्यात आले आहे. मराठी मतदारांनी ठाकरे ब्रँडवर विश्वास दाखवला, मात्र प्रत्यक्ष सत्ताकारणात वेगळाच खेळ घडल्याचा आरोप ‘रोखठोक’मध्ये करण्यात आला आहे.
जळगावमध्ये शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील विजयी ठरले असतानाही निकाल जाहीर करण्यात विलंब करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ईव्हीएममधील आकडे स्पष्ट असतानाही दुसऱ्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले. फेरमतमोजणीची मागणी केल्यावर उमेदवारांना पोलिस बळाचा वापर करून मतमोजणी केंद्राबाहेर काढण्यात आले आणि लाठीचार्ज झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
पुण्यातील वसंत मोरे यांच्या प्रभागात मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात ईव्हीएम मशीन अचानक बंद पडल्याचे कारण देण्यात आले. नव्या मशीनमध्ये जुन्या चिपचा वापर करून पुन्हा मतमोजणी केल्याने मोरे यांचा पराभव जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे जाहीर मतसंख्या आणि प्रत्यक्ष मोजलेल्या मतांमध्ये तब्बल ११०० मतांचा फरक आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
महानगरपालिका निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक झाल्या नसून निवडणूक यंत्रणाच दबावाखाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आणले गेले, तर निकालानंतर पैशांच्या जोरावर निवडून आलेल्या नगरसेवकांना सत्ताधाऱ्यांकडे वळवण्यात आल्याचेही ‘रोखठोक’मध्ये म्हटले आहे.
कल्याण-डोंबिवलीत मनसेचे राजू पाटील यांनी शिंदे गटाविरोधात निवडणूक लढवून निकालानंतर त्याच गटाला पाठिंबा दिला. ‘विकास’ या नावाखाली होणाऱ्या राजकीय फितुरीवर तीव्र शब्दांत टीका करत, या शब्दालाच बदनाम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुंबईच्या महापौर पदासाठी शिंदे गटाने दिल्ली दरबारी फेऱ्या मारल्यावरही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिवसेना नाव धारण करून महापौर पदासाठी दिल्लीत धावपळ करणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अपमान असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. तसेच निवडणुकांमध्ये उमेदवारांना कोट्यवधी रुपयांचे वाटप झाल्याचा आरोप करत, पैशाच्या बळावर लोकशाही विकत घेण्याचा धोकादायक प्रकार सुरू असल्याचे ‘रोखठोक’मधून अधोरेखित करण्यात आले आहे.




