spot_img

 Municipal Corporation Election : भाजप–शिवसेना युती तुटली, जागावाटपावरून घडामोडींना वेग

spot_img

जागांच्या तडजोडीवर एकमत न झाल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार; राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध पक्षांकडून युती–आघाडीच्या हालचालींना वेग आला असून अनेक ठिकाणी जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेने युती केली असली, तरी इतर शहरांमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळ्या भूमिका घेताना दिसत आहेत. अशातच अमरावती महानगरपालिकेबाबत मोठी राजकीय बातमी समोर आली आहे.

अमरावती महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू होती. मात्र आता ही युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, दोन्ही पक्षांतील चर्चा फिस्कटल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने भाजपकडे 25 जागांची मागणी केली होती. मात्र भाजपकडून हा प्रस्ताव मान्य करण्यात आला नाही. उलट भाजप केवळ 87 पैकी 15 ते 16 जागा देण्यास तयार होता. या जागावाटपावर एकमत न झाल्याने अखेर युती होऊ शकली नाही आणि दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

अमरावती महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीत गुंतले आहेत. राज्य पातळीवर युती असली तरी स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय घेतले जात असल्याचे अमरावतीच्या उदाहरणातून स्पष्ट होत आहे.

या निर्णयामुळे भाजप आणि शिवसेनेच्या मतांमध्ये विभागणी होण्याची शक्यता असून त्याचा थेट फायदा इतर पक्षांना होऊ शकतो. दरम्यान, शिवसेनेचे नेते अभिजीत अडसूळ आज सायंकाळी साडेपाच वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती असून, त्यात या घडामोडींवर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

उल्लेखनीय म्हणजे, 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने 45 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले होते आणि चेतन गावंडे महापौर झाले होते. त्या वेळी काँग्रेसला 15, शिवसेनेला 7, एमआयएमला 10, बसपाला 5, युवा स्वाभिमान पक्षाला 3 जागा मिळाल्या होत्या. तर आरपीआय (आठवले गट) आणि एका अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी एक जागा जिंकली होती. आता यंदाच्या निवडणुकीत बदललेली समीकरणे अमरावतीच्या राजकारणाला कोणत्या दिशेने नेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ