मुंबई उपनगरी रेल्वे व्यवस्थेत प्रवाशांच्या सुरक्षिततेसह आरामदायी प्रवासासाठी एक नवा प्रवास सुरू होणार आहे. धावत्या लोकलमधून पडून होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्याबरोबरच प्रवाशांना थंड, सुसज्ज आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मुंबई लोकल मार्गावर लवकरच वंदे मेट्रो एसी लोकल (Vande Metro AC Local) दाखल होणार आहे. या एसी लोकलमुळे प्रवासी वहनक्षमता वाढणार असून मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासात मोठा बदल घडणार आहे. या लोकलमध्ये प्रवाशांच्या आरामाला प्राधान्य देण्यात आले असून एअर-स्प्रिंग सेकंडरी सस्पेन्शन प्रणालीमुळे प्रवास धक्केमुक्त होणार आहे. तसेच यूएसबी चार्जिंग पॉइंट्स, इन्फोटेनमेंट सुविधा, प्रवाशांना आवश्यक माहिती देणारी प्रणाली तसेच प्रत्यक्ष वेळेत मार्ग दाखवणारे नकाशे अशी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
डब्यांची रचना सुटसुटीत पद्धतीने करण्यात आल्याने गर्दीचे योग्य व्यवस्थापन करता येणार आहे. तसेच यंत्रणा छत आणि तळभागावर बसवण्यात आल्यामुळे डब्यांमध्ये अधिक मोकळी जागा मिळणार. गादीयुक्त आसने, दिव्यांग तसेच व्हीलचेअर वापरणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र जागा देण्यात येणार असून, सर्व वंदे मेट्रो लोकल सेवेत आल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि जागतिक दर्जाचा होईल, असा विश्वास मुंबई रेल्वे विकास महामंडळाने व्यक्त केला आहे.




