spot_img

Mumbai Pune Expressway : 32 तास मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक ठप्प,जबाबदार कोण ?

spot_img

मुंबई आणि पुणे महाराष्ट्राची दोन मोठी शहर! ही दोन महत्वाची शहरं एकमेकांना जोडणारा आणि महाराष्ट्राची शान मानला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग’ म्हणजेच आपला एक्सप्रेसवे. पण 3 फेब्रुवारीला याच हायवेवर जे काही घडलं, त्याने संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न केलंय. 32 तास! तब्बल 32 तास हजारो लोक अन्न-पाण्याविना रस्त्यावर अडकून पडले होते. पण प्रश्न हा आहे की, ज्या महामार्गासाठी आपण भरमसाठ टोल भरतो, तिथे एका टँकरच्या अपघातामुळे संपूर्ण यंत्रणा इतकी हतबल कशी होऊ शकते?

मंगळवार, 3 फेब्रुवारीची ती संध्याकाळ. साधारण 5 वाजताच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलीन गॅसने भरलेला एक टँकर उलटला. हा गॅस अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे रोखली. पण ही खबरदारी पुढे प्रवाशांसाठी एक न संपणारा ‘सापशिडीचा खेळ’ ठरली. एका तासाचे दोन झाले, दोनचे दहा आणि बघता बघता 32 तास उलटले, पण वाहतूक सुरळीत झाली नाही. 25 ते 30 किलोमीटरच्या रांगा आणि त्या रांगेत अडकलेला प्रत्येक माणूस फक्त एकाच आशेवर होता – ‘आता रस्ता सुटेल!’

या 32 तासांत काय घडलं? तर लहान मुलांसाठी घेतलेलं गाडीतलं दूध संपलं होतं, डायपर नव्हते, पाणी नव्हतं. लहान मुले भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. ज्येष्ठ नागरिकांना औषधं घ्यायची होती, पण जेवण-पाणी जवळ नव्हतं. विशेषतः महिला प्रवाशांचे जे हाल झाले, ते शब्दांत मांडण्यापलीकडे आहेत. हायवेवर कोणत्याही सोयी सुविधा नाहीत, हे या घटनेने पुन्हा सिद्ध केलं. 10 रुपयांची पाण्याची बाटली 30 ते 50 रुपयांना विकली जात होती. त्यातून प्रवाशांची लूट होत होती. आपत्तीत इष्ट शोधणाऱ्या अशा प्रवृत्तींना रोखायला तिथे कुणीच नव्हतं. प्रशासनाने सांगितलं की आम्ही फूड पाकीटं वाटली. पण प्रश्न हा आहे की, ती पाकीटं कितव्या तासाला पोहोचली? आणि 25 किलोमीटरच्या रांगेत शेवटच्या गाडीपर्यंत ती खरोखर पोहोचली का?

NDRF आणि SDRF आपली ही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा इतकी ‘स्लो’ का आहे? प्रोपिलीन गॅस ट्रान्सफर करण्यासाठी दुसरा टँकर येण्यासाठी तासनतास का लागले? जर गॅस ज्वलनशील होता, तर तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचायला उशीर का झाला? 32 तास म्हणजे एक पूर्ण दिवस आणि रात्र उलटून गेल्यानंतरही जर आपल्याला एक टँकर बाजूला सारता येत नसेल, तर आपण कसल्या ‘स्मार्ट सिटी’ आणि ‘हाय-टेक इन्फ्रास्ट्रक्चर’च्या गप्पा मारतोय? हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. याच कोंडीत उद्यागपती डॉ. सुधीर मेहता यांनी हेलिकॉप्टर बोलवून स्वतःला एअरलिफ्ट करून त्या कोंडीतून स्वतःची सुटका करून घेतली. एका उद्यागपतील हे जमत मात्र राज्य सरकारला किंवा प्रशासनाला हे जाणत नाही, हे न समजण्यासारखे आहे.

गेल्या 26-27 वर्षांपासून हा हायवे सुरू आहे. पण आजही एका अपघातामुळे संपूर्ण ट्रॅफिक ठप्प का होतं? खरतर एक्सप्रेसवेवर अशा काही जागा हव्यात जिथून संकटकाळी वाहतूक दुसऱ्या बाजूला वळवता येईल किंवा पुन्हा मागे नेता येईल. उद्योगपती सुधीर मेहता यांनी म्हटल्याप्रमाणे, अशा ठिकाणी हेलिपॅड असणे गरजेचे आहे. जर एखाद्या रुग्णाची अवस्था गंभीर असती, तर त्याला वाचवण्यासाठी आपल्याकडे कोणती यंत्रणा होती? सत्ता कोणत्याही पक्षाची असो, एक्सप्रेसवेच्या सुरक्षिततेबाबत सगळेच सारखे! दरवेळी अपघात झाला की ‘चौकशीचे आदेश’ दिले जातात. पण त्या चौकशी अहवालाचं पुढे काय होतं? आजवर कोणत्या त्रुटी सुधारल्या गेल्या? याची उत्तर अद्याप मिळालेली नाहीत.

यावर गंभीर मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक मोठी पोस्ट करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज ठाकरे यांनी म्हटलंय की, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास 32 तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे.

आपण म्हणतो की सरकार बेजबाबदार आहे. पण हे सरकार निवडून कोण देतं? आपण मतं विकतो, जाती-पातीच्या राजकारणात अडकतो आणि मग जेव्हा असे भीषण हाल होतात, तेव्हा आपण सरकारला दोष देतो. ज्या लोकांमुळे आपण 32 तास रस्त्यावर अडकलो, त्यांना आपण पुन्हा निवडून देणार असू, तर परिस्थिती कधीच बदलणार नाही. आपण जो टोल भरतो, तो आपल्या सुरक्षित प्रवासासाठी असतो, प्रशासनाला पोसण्यासाठी नाही. 32 तासांनंतर टँकर हटला, वाहतूक सुरू झाली. पण त्या प्रवाशांच्या मनात निर्माण झालेली भीती आणि संताप कायम आहे. राज ठाकरे यांनी टोल माफीची मागणी केली आहे, मुख्यमंत्री चौकशी करणार आहेत. पण खरा प्रश्न शिल्लकच आहे – उद्या पुन्हा असा अपघात झाला, तर आपण पुन्हा 32 तास रस्त्यावरच झोपणार का? या गोंधळाला जबाबदार कोण? प्रशासनाचं नियोजन की आपलं राजकीय मौन? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ