लोणावळा येथील एकविरा देवीच्या यात्रेनिमित्त राज्यातील आगरी-कोळी समाजासह हजारो भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. यंदा ही यात्रा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस पार पडणार असून या काळात मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे.
ही टोलमाफी मिळवण्यासाठी मात्र खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचे अधिकृत पत्र आवश्यक असणार आहे. हे पत्र टोलनाक्यावर दाखविल्यासच भाविकांना टोलमाफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे भाविकांना दिलासा मिळाला असला तरी प्रत्येक भक्तापर्यंत हे पत्र कसे पोहोचणार, किती लोकांना ते उपलब्ध होणार, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. खासदारांनी टोल प्रशासनाकडे केलेल्या मागणीनंतर ही सवलत मंजूर करण्यात आली आहे. तसेच यात्रेला येणाऱ्या भाविकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.




