spot_img

Mumbai Municipal Corporation Election: मुंबई महापालिका निवडणुकीआधीच महापौरपदावरून राजकीय रणधुमाळी

spot_img

महापौर मराठी की हिंदू? वारिस पठाण यांच्या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली असून, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विशेषतः मुंबई महापालिका निवडणूक सर्वांच्या केंद्रस्थानी आली आहे.

मुंबई महापालिकेतील सत्तेसाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत निवडणूक लढवत असल्याने राजकीय समीकरणे बदलल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांची युती मुंबई महापालिका निवडणुकीत उतरली आहे. मात्र, मुंबईबाहेरील इतर महापालिकांमध्ये काही ठिकाणी युती तर काही ठिकाणी स्वतंत्र लढत पाहायला मिळत आहे.

निवडणुकीपूर्वीच मुंबईच्या महापौरपदावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महापौर हा मराठीच असावा, असा दावा काही राजकीय पक्षांकडून केला जात आहे, तर दुसरीकडे महापौर हा हिंदूच असावा, असा मुद्दाही पुढे येत आहे. या वक्तव्यांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या वादात आता एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी उडी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना वारिस पठाण यांनी धारावीतील सभेत थेट आव्हानात्मक भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, देशात मुस्लिम राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश होऊ शकतात, तर मग एक मुस्लिम महिला मुंबईची महापौर का होऊ शकत नाही?

हे विधान संविधान आणि लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचे सांगत त्यांनी पुढे म्हटले की, आमचे स्वप्न आहे की, एक दिवस हिजाब घालणारी आणि कलमा पठण करणारी मुस्लिम महिला मुंबई महापालिकेची महापौर बनेल. “जर महादेवावर प्रेम असल्याचे सांगणारी व्यक्ती महापौर होऊ शकते, तर मग मुस्लिम ओळख जपणारी महिला महापौर का होऊ शकत नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महापौरपदावरून आधीच मनसे आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादात आता एआयएमआयएमच्या सहभागामुळे हा मुद्दा अधिकच चिघळताना दिसत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक केवळ सत्तेसाठीच नव्हे, तर ओळख, विचारधारा आणि संविधानिक मूल्यांवरील संघर्ष म्हणूनही पाहिली जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ