आज रविवारी (18 जानेवारी) पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये 65 हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवत आरोग्य व फिटनेसचा संदेश दिला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोल्ड लेबल असलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम सुमारे 3.54 कोटी रुपये इतकी आहे. यंदाच्या मॅरेथॉनचे खास वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच 42 आणि 21 किलोमीटरच्या शर्यतीसाठी धावपटूंना मुंबईच्या कोस्टल रोडवरून धावण्याची संधी मिळाली.
सकाळी 5 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत मॅरेथॉनची औपचारिक सुरुवात झाली. ड्रीम रनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवला.
या मॅरेथॉनमध्ये अभिनेता आमिर खान आपल्या कुटुंबासह सहभागी झाला होता. यावेळी बोलताना त्याने नियमित व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच पाणी फाउंडेशनच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांविषयी विचारले असता, निकाल पाहण्यास वेळ मिळाला नसल्याचे त्याने सांगितले.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला. तरुणांनी मोबाईलपासून दूर राहून खेळ व व्यायामाला प्राधान्य द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. मुंबईतील बदललेल्या पायाभूत सुविधांबद्दल बोलताना, कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांमुळे शहराच्या विकासाला चालना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिका निवडणुकांबाबत प्रतिक्रिया देताना, ज्या पक्षाला जनतेने संधी दिली आहे त्यांनी नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मॅरेथॉनचे वेळापत्रक:
- हौशी मॅरेथॉन (42.995 किमी) – सकाळी 5.00 वा., सीएसएमटी
- 10 किमी शर्यत – सकाळी 6.00 वा., सीएसएमटी
- एलिट मॅरेथॉन (42.995 किमी) – सकाळी 7.00 वा., सीएसएमटी
- दिव्यांग मॅरेथॉन (1.6 किमी) – सकाळी 7.05 वा., सीएसएमटी
- ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन (4.2 किमी) – सकाळी 7.25 वा., सीएसएमटी
- ड्रीम रन (5.9 किमी) – सकाळी 8.15 वा., सीएसएमटी




