spot_img

Mumbai Local UTS App : मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठा डिजिटल बदल; UTS बंद, ‘रेल वन’ अॅप झाले अधिकृत

spot_img

मासिक ते सहामाही पाससाठी आता एकच अॅप, तिकीट आणि रेल्वे सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर

मुंबई लोकलने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी नव्या वर्षात रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डिजिटल सेवा अधिक सोप्या आणि एकसंध करण्याच्या उद्देशाने रेल्वेने ‘रेल वन’ (Rail One) हे नवीन अधिकृत मोबाइल अॅप सुरू केले आहे. या निर्णयामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर वापरात असलेल्या UTS मोबाईल अॅपवरील पास काढण्याची व नूतनीकरणाची सुविधा कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, आता मुंबई लोकलचे मासिक, त्रैमासिक आणि सहामाही पास केवळ रेल वन अॅपवरूनच उपलब्ध असतील. याआधी तिकीट, पास आणि इतर माहितीसाठी प्रवाशांना वेगवेगळ्या अॅप्सचा वापर करावा लागत होता. ही अडचण दूर करून ‘वन नेशन, वन अॅप’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी रेल वन अॅप विकसित करण्यात आले आहे.

या अॅपमध्ये फक्त पास आणि तिकीट बुकिंगच नव्हे, तर ट्रेनचे लाईव्ह स्टेटस, प्लॅटफॉर्म क्रमांक, प्रवासाशी संबंधित सूचना आणि इतर रेल्वे सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, UTS अॅपवरून आधी काढलेले पास वैध राहणार असून ते संपेपर्यंत वापरता येतील. मात्र, नवीन पास काढण्यासाठी किंवा जुन्या पासचे नूतनीकरण करण्यासाठी आता प्रवाशांना रेल वन अॅपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. हे अॅप अँड्रॉइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी रेल वन अॅपमध्ये UPI, नेट बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड आणि R-Wallet यांसारखे विविध पेमेंट पर्याय देण्यात आले आहेत. तिकीट बुकिंगदरम्यान पैसे अडकण्याच्या तक्रारी टाळण्यासाठी हाय-स्पीड पेमेंट गेटवे वापरण्यात आले आहे.

या बदलामुळे स्थानकांवरील तिकीट खिडक्यांपुढील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून, प्रवाशांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार आहेत. त्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वेने प्रवाशांना जास्तीत जास्त रेल वन अॅप वापरण्याचे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ