spot_img

Mumbai Local Update : 12 आणि 13 या दोन दिवसांत 240 लोकल रद्द, प्रवाशांचा होणार खोळंबा

spot_img

पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे कार्यालयीन वेळेत मोठा फटका; प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन

शनिवार–रविवारी मेगा ब्लॉकचा सामना केल्यानंतर मुंबईकरांचा आठवडा पुन्हा एकदा लोकलच्या अडचणींनी सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे सोमवार आणि मंगळवार, 12 व 13 जानेवारी रोजी तब्बल 240 लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. याचा सर्वाधिक परिणाम सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे.

कांदिवली ते बोरिवली दरम्यान सुरू असलेल्या सहाव्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने ब्लॉक घेण्यात येत आहेत. सध्या लागू असलेला 30 दिवसांचा मोठा ब्लॉक 18 जानेवारी 2026 पर्यंत राहणार असून, याच कालावधीत सोमवार आणि मंगळवारी मोठ्या प्रमाणावर लोकल रद्द केल्या जाणार आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, कांदिवली कारशेड परिसरात पॉइंट आणि क्रॉसओव्हर जोडणीचे महत्त्वाचे काम केले जाणार आहे. यासाठी अप आणि डाऊन जलद मार्गांवर रात्री आणि पहाटेच्या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या निर्बंधांमुळे 12 जानेवारी रोजी 120 आणि 13 जानेवारी रोजीही 120 लोकल सेवा रद्द होतील.

आठवड्याचे हे दोन दिवस अत्यंत गर्दीचे असल्याने लोकल रद्द होण्याचा फटका थेट कार्यालयीन वेळेत जाणवणार आहे. काही गाड्या उशिराने धावण्याची शक्यता असून, त्यामुळे स्थानकांवर गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक प्रवाशांना बस, खासगी वाहने किंवा पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागू शकतो.

दरम्यान, मध्य रेल्वेवरही मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या वेळेत धीम्या मार्गांवर ब्लॉक राहणार असून काही लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक तपासण्याचे आणि शक्य असल्यास प्रवासाचे नियोजन बदलण्याचे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ