मुंबई उपनगरीय रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी तिकीट खरेदीची प्रक्रिया आता अधिक जलद आणि सोपी होणार आहे. नेमकी कोणती सोय प्रवाशांसाठी करण्यात येणार आहे ते पाहणे उत्सुकतेचे राहिल. प्रवाशांच्या सोयाची विचार करुन पश्चिम रेल्वेच्या स्थानक परिसरात एकूण 325 नवे स्वयंचलित तिकीट विक्री यंत्र (ATVM)सुरु करण्यात येत आहेत. या आधुनिक यंत्रांमुळे प्रवाशांना काही सेकंदांत तिकीट मिळणार असून डिजिटल पेमेंटद्वारे पैसे भरण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
पश्चिम रेल्वेमध्ये 501 एटीव्हीएम कार्यरत आहेत. 110 मशिन जुनी झाल्याने ती काढून टाकून त्याऐवजी नवी मशिन बसवली जाणार आहेत आणि बाकीचे मशिन स्थानकांतील नव्या ठिकाणी हलवण्यात येणार आहेत. तिकीट खिडक्यांजवळच नव्हे तर पादचारी पुलांवरही ही यंत्रे उपलब्ध असतील. प्रवासी यूपीआय, डेबिट कार्ड आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे तिकीट काढू शकतील. यासोबतच रेल्वे (Railway) प्रशासनाने रेल वन मोबाइल अॅप सुरू केले असून त्याद्वारे स्मार्टफोनवरून थेट तिकीट खरेदी करता येणार आहे. यामुळे वेळेची बचत होऊन प्रवाशांचा त्रास कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




