125 वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल हटवण्यासाठी एक सलग मेगा ब्लॉक आणि सात छोटे ब्लॉक
मुंबईची ‘लाईफलाईन’ म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन काही काळ विस्कळीत होणार आहे. मध्य रेल्वेने एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामासाठी तब्बल 18 तासांचा सलग मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच अजून दोन-दोन तासांचे सात छोटे ब्लॉक घेण्यात येणार असल्याने मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता आहे.
वरळी–शिवडी उन्नत मार्गाच्या बांधकामासाठी ब्रिटिशकालीन 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल हटवण्याचे काम सुरू आहे. पुलाचा पूर्व आणि पश्चिमेकडील भाग आधीच हटवण्यात आला असला, तरी रेल्वेमार्गावर असलेला लोखंडी सांगाडा महिनाभरापासून काढता आला नव्हता. आता हे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेला हा लांब मेगा ब्लॉक आवश्यक ठरला आहे.
या कालावधीत लोकलसोबतच मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या सेवांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मुंबईकरांनी या काळात प्रवास करायचा असल्यास रेल्वेचं अपडेटेड वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लोकल उशिरा धावणे, गाड्या रद्द होणे किंवा मार्ग बदली होणे अशी परिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो.




