Mumbai First Non AC Local Train : मुंबईकरांचा प्रवास होणार हायटेक आणि सुरक्षित! ताजी हवा, ऑटोमॅटिक दरवाजे; देशातील पहिली ‘नॉन एसी’ बंद लोकल दाखल!

spot_img

लटकून प्रवास करण्याचे टेन्शन मिटणार; २४ आधुनिक ब्लोअर्समुळे डब्ब्यात खेळती राहील हवा, आयसीएफ चेन्नईकडून खास भेट

मुंबईच्या लोकल ट्रेनचा प्रवास आता कात टाकतोय. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने एक क्रांतिकारी पाऊल उचलले असून, भारताची पहिली ‘नॉन एसी बंद दरवाज्याची’ लोकल ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे. चेन्नई येथील इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये तयार झालेला हा १२ डब्यांचा खास प्रोटोटाईप (क्रमांक २६८२०१-२६८२१२) मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाला आहे. गर्दीच्या वेळी दरवाजात लटकून होणारे अपघात रोखण्यासाठी ही ट्रेन ‘गेम चेंजर’ ठरेल, अशी चिन्हे आहेत.

ही संपूर्ण ट्रेन ‘वेस्टिब्युल’ (Vestibule) प्रकारातील आहे, म्हणजेच मेट्रोप्रमाणे तुम्ही एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाऊ शकाल. यात सहा-सहा डब्यांचे दोन युनिट्स असून प्रवाशांची गर्दी विभागली जाईल. विशेष म्हणजे, या ट्रेनमध्ये कोणताही ‘फर्स्ट क्लास’ डबा नसेल, ज्यामुळे जास्तीत जास्त सामान्य मुंबईकरांना याचा लाभ घेता येईल. दरवाजा उघडा असताना गाडी सुरू होणार नाही, अशा सेन्सरवर आधारित सुरक्षेमुळे ‘लटकून प्रवास’ करण्याच्या जीवघेण्या प्रकाराला पूर्णविराम मिळणार आहे.

नॉन एसी आणि दरवाजे बंद म्हटल्यावर अनेकांना गुदमरल्यासारखे वाटण्याची भीती होती. मात्र, रेल्वेने त्यावर जबरदस्त उपाय शोधला आहे. या लोकलच्या छतावर अत्याधुनिक व्हेंटिलेशन युनिट्स आणि ब्लोअर्स बसवण्यात आले आहेत. हे ब्लोअर्स बाहेरून ताजी हवा आत खेचतील आणि डब्ब्यातील कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकतील. पावसाळ्यात यातून पाणी आत येणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे.

सध्या ही ट्रेन कुर्ला कारशेडमध्ये निरीक्षणासाठी पोहोचली असून, पुढील काही महिने याच्या तांत्रिक चाचण्या घेतल्या जातील. ऑटोमॅटिक दरवाज्यांमुळे स्थानकांवरील थांब्याचा वेळ (Dwell Time) थोडा वाढण्याची शक्यता आहे, त्याकडेही रेल्वे लक्ष देत आहे. मुंबईतील मेट्रो आणि वॉटर टॅक्सीप्रमाणेच आता ही नवी लोकल मुंबईकरांच्या प्रवासाचा चेहरामोहरा बदलण्यास सज्ज झाली आहे. लवकरच मुंबईकरांना या सुरक्षित ‘सुपरफास्ट’ प्रवासाचा आनंद घेता येईल.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ