सहा पानांची सुसाईड नोट सापडली; धमक्या आणि सततच्या त्रासामुळे टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती.
मुंबईत एका तरुण डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रियकराकडून होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणात अँटॉप हिल पोलिसांनी फजल मोहम्मद खान (३१) याला लोअर परळ परिसरातून अटक केली आहे. डॉक्टर स्तुती बजरंग सोनावणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील चौकशीतून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्तुती सोनावणे आणि फजल खान यांची ओळख एका डेटिंग अॅपवर झाली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र या काळात त्यांच्या नात्यात वारंवार वाद होत होते. वादाच्या वेळी फजल खान तिच्यावर दबाव टाकत असे आणि तिला मारण्याच्या धमक्या देत असल्याचेही समोर आले आहे.
घटनास्थळी पोलिसांना सहा पानांची सुसाईड नोट मिळाली आहे. या नोटमध्ये प्रियकराकडून होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच फजल तिला “एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील” अशी धमकी देत असल्याची माहिती स्तुतीने आपल्या एका मैत्रिणीलाही दिली होती, असे तपासात समोर आले आहे.
८ मार्च रोजी स्तुतीचे आई-वडील जेवणासाठी घराबाहेर गेले होते. ते परत आल्यानंतर स्तुती तिच्या खोलीचा दरवाजा उघडत नव्हती. संशय आल्याने तिच्या वडिलांनी दरवाजा तोडला असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन अहवालात गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेचा अधिक तपास अँटॉप हिल पोलीस करत असून पुढील चौकशीतून नेमके काय घडले याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.




