spot_img

Mumbai Crime Marathi Manoos: कार्यालयीन बैठकीत मराठी शिपायाला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ; गोवंडी पोलिसांची कठोर कारवाई

spot_img

मुंबईत मराठी कर्मचाऱ्याचा अपमान; बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा

राज्यात मराठी विरुद्ध अमराठी वाद चिघळलेला असतानाच, मुंबईत मराठी माणसाचा अपमान आणि जातीवाचक द्वेषाचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि रहेजा होम्सचे मालक सुशील रहेजा यांनी त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका मराठी शिपायाला मारहाण केल्याचा आणि जातीवाचक शब्दांत अपमान केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी रहेजा यांच्यावर ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुण चेंबूर येथील डॉ. सी. जी. गिडवाणी रोडवर असलेल्या रहेजा होम्सच्या मुख्य कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होता. घटनेच्या दिवशी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. या बैठकीदरम्यान सुशील रहेजा यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे मागवली होती. संबंधित कर्मचाऱ्याने ती कागदपत्रे दिली, मात्र ती नीट स्टॅपल न झाल्याने रहेजा संतापले.

या किरकोळ कारणावरून सुशील रहेजा यांनी बैठकीतच त्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी त्यांनी “तुम घाटी लोग सुधरोगे नही”, “तुमची लायकी हीच आहे” अशा शब्दांत मराठी समाजाचा आणि संबंधित कर्मचाऱ्याच्या जातीचा अपमान केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सर्वांसमोर मुद्दाम जातीवाचक टिप्पणी करून मानसिक छळ करण्यात आल्याचेही पीडिताने पोलिसांना सांगितले आहे.

पीडित कर्मचाऱ्याने आपल्या तक्रारीत केवळ शारीरिक मारहाणीचा नव्हे, तर मानसिक छळाचाही आरोप केला आहे. आपण अनुसूचित समाजातील असल्याने आपल्याला कायमचे कामावरून काढता यावे आणि पुन्हा नोकरी मागण्याची हिंमत होऊ नये, या हेतूने आपल्याशी भेदभाव करण्यात आल्याचा दावा त्याने केला आहे.

या प्रकरणाची दखल घेत गोवंडी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून, सुशील रहेजा यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११५ (स्वेच्छेने दुखापत करणे) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमे लावण्यात आली आहेत.

दरम्यान, शहरातील एका नामांकित उद्योगपतीकडून अशा प्रकारचे वर्तन झाल्याने सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून आता कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाण्याची शक्यता असून, बैठकीला उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचे जबाबही लवकरच नोंदवले जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ